April 27, 2025

पुणे: सिंहगड रस्त्यावरील एकतानगरमधील सर्व सोसायट्यांचा वीजपुरवठा पूर्ववत

पुणे, दि. २७ जुलै २०२४: सिंहगड रस्त्यावरील पूरग्रस्त एकतानगरीमध्ये २५० ग्राहकांकडील बंद ठेवलेला वीजपुरवठा शनिवारी (दि. २७) सकाळी १० पर्यंत पूर्ववत करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. २५) महावितरणचे १९ रोहित्र पुराच्या पाण्यात गेल्याने सुमारे ६५ सोसायट्यांमधील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.

त्यानंतर अभियंते व कर्मचारी यांनी सोसायट्यांच्या सहकार्याने पाण्याचा निचरा झाल्यानंतर शुक्रवारी (दि. २६) सकाळपर्यंत १४ रोहित्रांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. त्यानंतर सायंकाळपर्यंत उर्वरित ५ पैकी पाण्यात बुडालेले ३ रोहित्र नादुरुस्त झाल्याने ते केवळ बदलून सर्वच पाच रोहित्रांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र १४ लहान सोसायट्यांमध्ये पाणी कायम असल्याने २५० ग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागला. त्यानंतर पाण्याचा निचरा झाल्यानंतर या ग्राहकांकडील वीजपुरवठा शनिवारी (दि. २७) सकाळी १० वाजेपर्यंत सुरु करण्यात आला.