July 8, 2025

पुणे: आषाढी वारीतील दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान; शासन निर्णय जाहीर

पुणे, १४ जून २०२५: आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या १,१०९ दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत काढण्यात आला आहे.

मागील वर्षी आषाढी यात्रा २०२४ दरम्यानही याचप्रमाणे प्रत्येकी दिंडीला २० हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले होते. त्यावेळी विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडून एकूण १,१०९ दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती. यावर्षीही हेच प्रमाण कायम ठेवून एकूण २ कोटी २१ लाख ८० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

मुंबईत पार पडलेल्या एका बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तर उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही दिली.

प्रशासनाकडून यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात येत असून, यंदाही प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्यामुळे वारकऱ्यांना अधिक सोयी-सुविधा मिळण्याची शक्यता आहे.