May 21, 2025

पुणे: सकल ब्राह्मण समाजाचा भाजपसह महायुतीला संपूर्ण पाठिंबा

पुणे, २६/१०/२०२४: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाला आणि त्यासोबतच्या महायुतीला सकल ब्राह्मण समाज एकमुखाने पाठिंबा जाहीर केला आहे. ह्या संदर्भात ब्राह्मण संघटनांचे मुख्य समन्वयक भालचंद्र कुलकर्णी आणि समन्वयक चैतन्य जोशी, मयुरेश अरगडे यांनी आज घोषणा केली. भाजपबरोबरच महायुतीचे इतर घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी याना सुद्धा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या मतदारसंघांमध्ये ब्राह्मण समाजाचा देखील विचार करावा अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाची होती आणि त्यावर महायुतीने सकारात्मक विचार केला असे त्यांचे म्हणणे आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (नागपूर) यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे, त्यांच्याबरोबरच संजय केळकर (ठाणे), अतुल भातखळकर (कांदिवली), पराग अळवणी (विले पार्ले), राजन नाईक (नाला सोपारा), सुधीर गाडगीळ (सांगली) तसेच उदय सामंत (रत्नागिरी), किरण सामंत (राजापूर) या ब्राह्मण समाजातील उमेदवारांना निवडणूकीत उमेदवारी मिळाल्याने भाजपने सर्वसमावेशक असा विचार केल्याचे दिसून येते. त्याचबरोबर भाजपच्या राज्यातील संघटनात्मक कामाची महत्वपूर्ण जबाबदारीच्या महामंत्रीपदी राजेश पांडे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे तर कोथरुडच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांची राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याने ब्राह्मण समाजाबद्दल भाजपने दाखवलेल्या सकारात्मक भावनेची आम्ही आनंदाने दखल घेत आहोत, असे एका परिषदेत सकल ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी म्हणाले.

हिंदुत्वाची पताका आपल्या खांद्यावर घेवून अधिक सकारात्मक काम करणारा राष्ट्रसमर्पित असलेला ब्राह्मण समाज आहे. या समाजाप्रती अत्यंत चांगली अशी सकारात्मक वागणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यात सुरुवातीला खुल्या प्रवर्गासाठी अमृत महामंडळ दिले तर नुकतेच ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे स्वतंत्र महामंडळ देखील दिले आहे. याची सार्थ जाणीव आम्हा सर्वांना आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर ब्राह्मण समाजाने कायमच भाजपला साथ दिलेली आहे. राज्यातील सध्याचे वातावरण पाहता हिंदुत्वाचा मुद्दा भाजपने केंद्रस्थानी ठेवला आहे व हीच ब्राह्मण समाजाची देखील भूमिका आहे. आम्ही खालील सर्व ब्राह्मण संस्था, संघटनांचे पदाधिकारी हिंदुत्वाचा जयघोष व्हावा या हेतूने भारतीय जनता पक्षाला आणि त्यासोबतच्या महायुतीला जाहीर संपूर्ण पाठिंबा देत आहोत, असे मुख्य समन्वयक कुलकर्णी म्हणाले.