June 14, 2024

पुणे: महावितरणच्या अभियंत्यास धक्काबुक्की, केल्याप्रकरणी आरोपीस तात्काळ अटक

पुणे, दि. १५ मार्च २०२३: वीजबिलांच्या थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित केलेल्या विद्युत जोडणीची तपासणी करीत असताना महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीसांनी आरोपी रमेश थोरात यास तात्काळ अटक केली आहे. त्यानंतर मा. न्यायालयाने या आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी की, भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. उदय भोसले, सहायक अभियंता रमेश सूळ, वरीष्ठ तंत्रज्ञ सुहास ढेंगळे हे मोशी प्राधीकरणमध्ये रविवारी (दि. १२) दुपारी अडीचच्या सुमारास वीजबिलांच्या थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या वीजजोडणीची तपासणी करीत होते. यामध्ये आशियाना बिल्डिंगमध्ये कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही एका फ्लॅटमध्ये वीजवापर सुरु असल्याचे आढळून आले. यासंदर्भात पुढील कारवाई करण्यासाठी वीजपुरवठा खंडित केला असता कोणाच्या आदेशाने वीजपुरवठा खंडित केला असे म्हणत रमेश बाबूराव थोरात (वय ४७, रा. आशियाना बिल्डिंग, सेक्टर ४, मोशी) नामक व्यक्तीने कार्यकारी अभियंता श्री. भोसले यांना धक्काबुक्की केली व अरेरावीची भाषा वापरली. तसेच सहायक अभियंता श्री. सूळ यांच्या चारचाकी वाहनाची हवा सोडली.

या प्रकरणी कार्यकारी अभियंता श्री. भोसले यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी वेगवान कारवाई करीत आरोपी रमेश थोरात याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास तात्काळ अटक केली.

वीजग्राहकांच्या सेवेत अहोरात्र कर्तव्य बजावणारे महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी सध्या कंपनीच्या आर्थिक संकटामुळे थकीत वीजबिलांच्या वसुली मोहीम राबवित आहेत. या दरम्यान कर्मचाऱ्यांना मारहाण, धक्काबुक्कीचे प्रकार झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाणार आहे. सोबतच पोलिस विभागाचे चांगले सहकार्य मिळत आहे. शासकिय कर्तव्य बजावताना मारहाणीचे प्रकार झाल्यास तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रात्रंदिवस सेवा देणाऱ्या अभियंता व कर्मचाऱ्यांना वीजबिल वसुलीदरम्यान मारहाण करणे किंवा कार्यालयात धुडगूस घालणे या सारख्या दुर्दैवी प्रकारांना सामोरे जावे लागू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दोन ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद – सरकारी कामात अडथळा आणणे (कलम ३५३), कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, अपशब्द वापरणे (कलम ५०४), धमकी देणे (कलम ५०६), मारहाण करणे (कलम ३३२ व ३३३), कार्यालयात जबरदस्ती प्रवेश करून तोडफोड करणे (कलम ४२७), सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, कार्यालयात गोंधळ घालणे (कलम १४३, १४८ व १५०), अनधिकृत जमाव गोळा करणे (कलम १४१ व १४३) आदी प्रकारांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलमांन्वये कारवाईची तरतूद आहे. या विविध कलमांन्वये दोन ते १० वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.