June 22, 2025

पुणे: वाघोलीत बर्निंग कारचा थरार; सुदैवाने जीवितहानी टळली

वाघोली, १४ मे २०२५: वाघोलीतील पुणे अहिल्यानगर महामार्गावर चुलबूल धाब्यासमोर रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास एका धावत्या कारने अचानक पेट घेतला. या थरारक घटनेमुळे काही वेळ मार्गावरील वाहतूक थांबवावी लागली. प्रसंगावधान राखत कारमधील चालक आणि त्यासोबतची व्यक्ती वेळीच बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कारने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि दोघेही बाहेर पडले. त्यानंतर कारच्या पुढील भागातून मोठ्या प्रमाणात धूर व ज्वाळा दिसू लागल्या. या आगीची माहिती मिळताच वाघोलीतील पीएमआरडीए अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन कर्मचारी अल्ताफ पटेल, प्रशांत अडसूळ, लक्ष्मण मिसाळ आणि महेश पाटील यांनी मिळून आगीवर नियंत्रण मिळवले.

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे कारचा केवळ पुढील भागच जळाला आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर काही काळ वाघोली परिसरात बर्निंग कारचा थरार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.