June 22, 2025

पुणे वाहतूक पोलीस अकॅडमीत १००% अधिकारी-अंमलदारांना प्रशिक्षण; १८ सत्रांत मान्यताप्राप्त तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पुणे, १४ मे २०२५: पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या पुणे वाहतूक पोलीस अकॅडमी अंतर्गत २३ फेब्रुवारी २०२५ ते १० मे २०२५ या कालावधीत एकूण १८ प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत दर सत्र तीन दिवसांचे होते. या कालावधीत वाहतूक शाखेतील ६३ पोलीस अधिकारी आणि १०४५ पोलीस अंमलदार अशा १००% कर्मचारीवर्गाला प्रशिक्षण देण्यात आले.

सदर प्रशिक्षणाचा उद्देश वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना अल्प कालावधीत अधिकाधिक ज्ञान देणे हा होता. प्रशिक्षणामध्ये मोटार वाहन कायदे, वाहतूक नियमन, जनतेशी सौजन्याने वागण्याचे तत्त्व, ग्रीन कॉरिडोर, व्हीव्हीआयपी ताफ्यामधील कार्यवाही, ई-चलान प्रणालीचा वापर आणि सीपीआर फर्स्ट एड ट्रीटमेंट यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर भर देण्यात आला. प्रशिक्षणामध्ये सॉफ्ट स्किल्स आणि मानसोपचार यावरही तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सत्र घेतली.

या सत्रांमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांमध्ये अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, आरटीओचे अधिकारी अनिल पंतोजी, प्रकाश जाधव, अशोक शिंदे, मानसोपचार तज्ज्ञ उर्मिला दीक्षित, मेधा कदम, सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षक सुरेश गोखले, डॉ. श्याम गायकवाड (फर्स्ट एड), तसेच ट्राफिक ई-चलान प्रशिक्षक अमित गोंजारी यांचा समावेश होता. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले असून या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांचे व्यावसायिक कौशल्य आणि नागरी संवादक्षमता वाढवण्याचा प्रयत्न झाला.

या संपूर्ण प्रशिक्षण उपक्रमाचे मार्गदर्शन पोलीस उपायुक्त वाहतूक अमोल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली झाले. प्रशिक्षणात वरील अधिकारी आणि तज्ज्ञांचे मोलाचे योगदान लाभले असल्याचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.