April 13, 2024

पुणे: जेजुरीतील माजी नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, खंडणी विरोधी पथक दोनची कामगिरी

पुणे, दि. ९/०७/२०२३: जमिनीच्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेजुरीतील माजी नगरसेवकाची हत्या करुन पसार झालेल्या दोघा हल्लेखोरांना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक दोनने डेक्कन परिसरातून अटक केली. हल्लेखोरांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वनीस प्रल्हाद परदेशी (रा. गुरुवार पेठ, पुणे, मुळ गाव रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी ) आणि महादेव विठठल गुरव ऊर्फ काका परदेशी (वय ६५ रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी, मुळगाव मु. पो. वाजेगाव, ता. फलटण, जि. सातारा ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महेबुब सय्यदलाल पानसरे (रा. जेजुरी) असे हत्या केलेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून कोम्बिंगं ऑपरेशन व प्रतिबंधक कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेजुरीतील माजी नगरसेवक महेबुब पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी डेक्कन परिसरात येणार असल्याची माहिती एसीपी सतीश गोवेकर यांना पोलिसांना मिळाली होती.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, शंकर संपते, सैदोबा भोजराव, चेतन अपाटे, प्रदिप गाडे, पवन भोसले यांची दोन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. पथकाने डेक्कन परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी महेबुब पानसरे यांच्यासोबत जमिनीचा वाद होता. त्याच वादातून इतर साथीदारांच्या मदतीने पानसरे यांची हत्या केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, संदिप कर्णिक, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.