पुणे, दि. १५/०५/२०२३ – कपडे धुण्यासाठी खडकवासला गोर्हे खुर्दमध्ये धरण पात्रात उतरलेल्या ७ मुलींपैकी दोन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परिसरात दहाव्याच्या विधीला आलेल्या नागरिकांसह अग्निशमक दलामुळे पाच मुलींना वाचविण्यात यश आले आहे. ही घटना १५ मे रोजी सकाळी घडली असून संबंधित मुली एकमेकींच्या नातलग आहेत. पोहता येत नसल्यामुळे बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
“गोर्हे खुर्द परिसरातील धरण पात्रात ९ मुली कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यापैकी ७ मुली पोहण्यासाठी पाण्यात उतरल्या. मात्र, बुडू लागल्यामुळे आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघींचा मृत्यू झाला असून उर्वरित मुलींना वाचविण्यात यश आले आहे” – भाउसाहेब ढोले पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली
गोर्हे खुर्द गावात संबंधित मुली नातलगांकडे आल्या होत्या. सोमवारी (दि.१५) सकाळच्या सुमारास त्या नउजणी कपडे धुण्यासह अंघोळीसाठी धरण पात्रानजीक गेल्या होत्या. कपडे धुतल्यानंतर ७ मैत्रिणी अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या. मात्र, पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मुली बुडू लागल्या. त्यामुळे त्यांनी आरडाओरड सुरु केली. त्याचवेळी परिसरात दहाव्याच्या विधीसाठी आलेल्या नागरिकांनी मुलींना वाचविण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. नागरिकांनी सात पैकी पाच मुलींना पाण्याबाहेर काढून जीव वाचविला. मात्र, दोन मुलींचा शोध घेण्यास अपयश आले. तोपर्यंत स्थानिकांनी घटनेची माहिती अग्निशमक दलाला दिली होती. त्यानुसार पीएमआरडीए अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले.
चौकट- दहाव्याचा विधी पाच मुलींसाठी ठरला वरदान
पाण्यात बुडू लागल्यामुळे मुलींनी आरडोओरड करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी परिसरात दहाव्याच्या विधीसाठी एकत्रित जमलेल्या नागरिकांनी धरणाकडे धाव घेतली. मुली बुडत असल्याचे दिसताच, नागरिकांनी पाण्यात उडी मारुन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या धावपळीमुळे पाचजणींना वाचविण्यात यश आले असून दोघींचा मृत्यू झाला. दहाव्याचा विधी पाच मुलींसाठी वरदान ठरल्याचे बोलले जात आहे.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन