June 24, 2024

पुणे: पतीला धडा शिकविण्यासाठी कंपनीची कॅब बॉम्बने उडविण्याची धमकी- महिला अटक

पुणे, १४/०६/२०२३: पतीला धडा शिकविण्यासाठी त्याच्या कंपनीची कॅब बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा ई-मेल महिलेने पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.

फरहीन अलरुमान शेख (वय ३३, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत खराडी येथील ऑल स्टेट कंपनीच्या व्यवस्थापकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कंपनीत ११ जून रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडला. ऑल स्टेट कंपनीमध्ये अलरुमान शेख (वय ३२) कामाला आहेत. त्यांनी दुसरे लग्न केले. त्यामुळे पती-पत्नीत वाद होत होते. अलरुमान याची नोकरी जाण्याच्या हेतूने तिने पतीचा मेल आय डी वापरुन फिर्यादीच्या कंपनीच्या मेलवर मेल पाठविला. त्यात कंपनीचे कार्यालय आणि कॅब उडविण्याची धमकी दिली.

धमकीचा मेल पाहिल्यानंतर व्यवस्थापकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने कंपनीच्या सर्व कॅबची बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडून तपासणी केली. त्यात काहीही आढळून आले नाही. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. तेव्हा फरहीनने मेल केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तिला पोलिसांनी अटक केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे तपास करत आहेत.