May 16, 2024

वकील तरुणीचा विनयभंग, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यावर गुन्हा

पुणे, 14/02/2023: वकील तरुणीचा विनयभंग तसेच तिला धक्काबुक्की केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यासह चौघांच्या विरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका वकील तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल, त्यांची पत्नी संध्या, एका महिलेसह चौघांच्या विरुद्ध विनयभंग, धक्काबुक्की, शिवीगाळ करुन धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दयानंद इरकल शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात राहायला आहेत. सोमवारी (१३ फेब्रुवारी) रात्री पावणेनऊच्या सुमारास वकील तरुणी दुचाकीवरुन पूना हाॅस्पिटलकडे निघाली हाेती. त्या वेळी आरोपी त्या वेळी इरकल, त्यांची पत्नी, एक महिलेसह चौघे जण माेटारीतून निघाले होते. पत्रकार संघाकडे जाणाऱ्या पुलावर दुचाकीस्वार तरुणीने हाॅर्न वाजविल्याने इरकल आणि मोटारीतील तिघे जण चिडले.
त्यांनी मोटार बाजूला थांबवून वाद घालण्यास सुरुवात केली. दयानंद इरकल यांनी अश्लील वर्तन करुन विनयभंग केला. इरकल यांची पत्नी संध्याने चपलेेने मारहाण केली तसेच मोटारीतील एक महिला आणि एका व्यक्तीने धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली, असे तक्रारदार तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर तपास करत आहेत.