November 24, 2026

डेक्कन जिमखाना अ‍ॅक्वाटिक्स होम गाला वॉटरपोलो स्पर्धेत रेड वॉरियर्स संघाला विजेतेपद

पुणे, 23 नोव्हेंबर 2026: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आणि पुणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेखाली आयोजित करण्यात आलेल्या डेक्कन जिमखाना अ‍ॅक्वाटिक्स होम गाला वॉटरपोलो स्पर्धेत अंतिम फेरीत रेड वॉरियर्स संघाने यलो शार्क्स संघाचा 7-5 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

डेक्कन जिमखाना येथील टिळक जलतरण तलावावर सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम अंतिम सामन्यात रेड वॉरियर्स आणि यलो शार्क्स या दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत एकमेकांना कडवी झुंज दिली. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी वेगवान चाली आणि अचूक गोल करण्याच्या संधी निर्माण करत सामन्यात रंगत आणली. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन गोल नोंदवत मध्यंतराला ३-३ अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे उत्तरार्धात विजेतेपदासाठी चुरस अधिकच वाढली.

उत्तरार्धात रेड वॉरियर्सच्या खेळाडूंनी अधिक आक्रमक पवित्रा घेत गोल करण्याच्या संधींचा अचूक फायदा उठवला. पियुष सूर्यवंशीने चार गोल नोंदवत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याला ओजस थोरात, विवेक आटोळे आणि नंदिनी मेनकर यांनी प्रत्येकी एक गोल करून सुरेख साथ दिली. दुसरीकडे, यलो शार्क्सकडून स्वयम परदेशीने चार गोल करत विजयासाठी जोरदार प्रयत्न केले, तर मोहित भाटेने एक गोल नोंदवला. मात्र, रेड वॉरियर्सच्या सांघिक खेळापुढे यलो शार्क्सचे प्रयत्न अपुरे पडले आणि रेड वॉरियर्सने ७-५ अशा विजयासह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण छत्रपती पुरस्कार विजेते संजय करंदरीकर, डेक्कन जिमखानाचे सर चिटणीस मिहीर केळकर आणि छत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी टिळक टँकचे सचिव शौर्य करंदीकर, स्पर्धेचे अध्यक्ष नीर चौहान, स्पर्धेचे सचिव मोहित मारणे आणि डेक्कन अॅक्वेटिक्स अकादमीचे इन्चार्ज रोहित बर्वे उपस्थित होते.

निकाल:अंतिम फेरी:

रेड वॉरियर्स: 7(पियुष सूर्यवंशी 4, ओजस थोरात 1, विवेक आटोळे 1, नंदिनी मेनकर 1) वि.वि.यलो शार्क्स: 5(स्वयम परदेशी 4, मोहित भाटे 1); मध्यांतर: 3-3

इतर पारितोषिके
उभारता उदयोन्मुख खेळाडू(मुले): ओजस थोरात;
उभारता उदयोन्मुख खेळाडू(मुली): वाणी सिंघल