October 5, 2024

सुरक्षितता हा आमचा अधिकार आहे! अभिव्यक्ती आयोजित अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, २१/०८/२०२४: एखादी विनयभंग, छेडछाड, बलात्काराची घटना जेव्हा कुठेही घडते तेव्हा त्याचा थेट परिणाम हा आमच्या शिक्षणावर, फिरण्यावर, आमच्या स्वातंत्र्यावर होतो हे या नराधामांना कसं समजत नाही, असा संतप्त सवाल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विशेषतः ग्रामीण भागातून आलेल्या मुलींनी उपस्थित केला. निमित्त होते अभिव्यक्ती आयोजित अभियान ‘सुरक्षितता हा आमचा अधिकार आहे’.

हे अभियान पुण्यात शास्त्री रोड आणि गुडलक चौक परिसरात २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत राबवले. नुकतीच घडलेली कोलकत्यातील डॉक्टर मुलीवर बलात्कार करून हत्येची घटना, महाराष्ट्रातील घडलेली बदलापूर व पुण्यातील कॅम्प परिसरातील अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची घटना याचा निषेध व्यक्त करत हे अभियान राबवलं असं उपक्रमाच्या समन्वयक वर्षा सपकाळ यांनी सांगितले.

शाळेतील गुड टच बॅड टच सारखे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवले पाहिजे असं उपस्थित महिलांनी सांगितलं.

जन्माला आल्यापासून पुरुष म्हणून घडताना व आजकाल सहज उपलब्ध होत असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून मुलींना दाखवली जाणारी उपभोगाची वस्तू यातून नकळत मुलींना गृहीत धरणं हे विचार नकळत तयार होतात अशी मत अभियान दरम्यान मुलांनी व्यक्त केली.

अभिव्यक्तीच्या कार्यकर्ते हातात प्लायकार्ड, बॅनर पकडून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत त्यांच्याबरोबर संवाद साधत होते. त्याचबरोबर याबाबतची पत्रकेही सर्वांना देण्यात आली. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.