May 20, 2024

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू, अर्ज करण्याची अंतिम मुदत १० मेपर्यंत

पुणे, २३/०४/२०२४: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांतील पदवी, पदव्युत्तर आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परिक्षा अनिवार्य आहे. त्यासाठीची ही प्रक्रिया शनिवारी (दि.२०) पासून सुरु झाली असून विद्यार्थ्यांना १० मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ५२ विभाग असून दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येतात. नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यासह संपूर्ण देशभरातून विद्यार्थी विद्यापीठातील विभागांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करतात. यावेळी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना २० दिवसांची मुदत देण्यात आली असून पदवी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा १३ जून रोजी, तर पदव्युत्तरसाठी परीक्षा १४ ते १६ जून या दरम्यान घेण्यात येणार आहे. पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परिक्षेसाठी उमेदवारांनी १२वी उत्तीर्ण केलेली असावी तर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान आवश्यक गुणांसह पदवीधर पदवी धारण केलेली असावी, असे पात्रतेचे निकष आहेत. ही प्रवेश परीक्षा १०० गुणांची असून, २० गूण हे सामान्य ज्ञानावर असतात, तर ८० गुणांची संबंधीत विषयाची परीक्षा असते. या परिक्षेचा कालावधी दोन तासांचा असून ही प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.

प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक
– ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत : १० मे
– परीक्षेची संभाव्य तारिख :
१) पदवी : १३ जून
२) पदव्यूत्तर पदवी : १४ ते १६ जून
अधिक माहितीसाठी : https://campus.unipune.ac.in/