June 14, 2024

मराठी-हिंदी नाट्य-चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना २०२३ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

पुणे, 23 मार्च 2023- पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे गेली ३३  वर्षे सातत्याने दिला जाणारा आणि देशासह परदेशातही प्रतिष्ठेचा समजला जाणारा २०२३ या वर्षाचा पुण्यभूषण पुरस्कार मराठी-हिंदी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना देण्याचे डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे निश्चित केले आहे. त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना देखील गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी कळविले आहे.

जुलै महिन्यात हा दिमाखदार सोहळा होणार असून या पुरस्कराचे यंदाचे ३४ वे वर्ष आहे. सलग ३३ वर्षे संस्थेने, संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि देशाच्या बाहेरही या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराचा भव्य उपक्रम राबविला.  स्मृतिचिन्ह आणि रूपये एक लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरणाऱ्या बालशिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असलेले  स्मृतिचिन्ह हे या पुरस्कारचे वैशिष्ट्य आहे. याबरोबरच कर्तव्य बजावित असताना जखमी झालेल्या ५ जवानांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये सेलर राधाकृष्णन्, हवालदार पंजाब एन. वाघमारे, सेलर सुदाम बिसोई, गनर उमेंद्र एन. आणि लान्स नाईक निर्मलकुमार छेत्री यांचा गौरव करण्यात येणार आहे. यापूर्वी विविध क्षेत्रातील आपल्या अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव जगभर पोचविणाऱ्या ३३  ज्येष्ठ पुणेकरांना गौरविण्यात आले आहे. तर महामहिम माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लोकसभेचे सभापती सोमनाथ चटर्जी , मनोहर जोशी, खासदार शरद पवार आणि महाराष्ट्राचे सर्वच माजी मुख्यमंत्री, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटपटू कपिल देव, सचिन तेंडूलकर, पांडुरंगशास्त्री आठवले, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, वसंतराव साठे, नानासाहेब गोरे, तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम्, मधु दंडवते, दि हिंदूचे संपादक एन. राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सिताराम येचुरी, गिरीश कर्नाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा, महेश एलकुंचवार, डॉ. विकास आमटे, आशा भोसले, नारायण मूर्ती, शरद यादव, नितीन गडकरी, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. अमदजअली खान आणि पं. शिवकुमार शर्मा, प्रफुल्ल पटेल आदी मान्यवरांनी पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करून नामांकित पुणेकरांचा यथोचित सन्मान केला आहे.