पुणे, १० जून २०२५ ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज आपल्या स्थापनेला २६ वर्ष पूर्ण करत २७व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त पक्षाच्या दोन्ही गटांनी पुण्यात स्वतंत्रपणे वर्धापन दिन साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे सकाळी १० वाजून १० मिनिटांनी पक्ष कार्यालयाबाहेर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
या कार्यक्रमानंतर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘प्रवास २६ वर्षांचा, मेळा निष्ठावंतांचा’ या संकल्पनेवर आधारित वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला शरद पवार, पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच पक्षाचे अनेक खासदार, आमदार व निष्ठावान कार्यकर्ते सहभागी होत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे देखील आजच दुपारी ३ वाजता बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
एकेकाळी एकसंध असलेला पक्ष आज दोन गटांत विभागला गेला असला तरी, दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे पक्षाच्या २७व्या वर्धापन दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस चर्चेत आली आहे.
More Stories
पुणे मेट्रोचे खडकी स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिरसात न्हालं वातावरण
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार