June 22, 2025

दादांची आठवण मला रोजच येते – खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुणे, १० जून २०२५ ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) २५व्या वर्धापन दिनानिमित्त आज पुण्यातील पक्ष कार्यालयात पारंपरिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे अन्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी पक्षातील एकोपा, कुटुंबातील नातेवाईक, आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या. विशेषतः पक्षातील भाऊ अजित पवार यांच्या आठवणीबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, “दादांची आठवण मला रोजच येत असते. मला सहा भाऊ आहेत आणि त्यांच्याशी दररोज संवाद होतो. मी सर्व भावांना शुभेच्छा देते.” यावेळी त्यांनी अजित पवारांचे नाव घेतले नसले तरी त्यांच्या भावना स्पष्ट दिसून आल्या.

“लोकशाहीत मत मांडणं चुकीचं नाही” – सोशल मीडियावरील स्टेटसवर स्पष्टीकरण
सुप्रिया सुळे यांनी अलीकडेच समाजमाध्यमांवर एक सूचक स्टेटस पोस्ट केलं होतं. त्यासंदर्भात विचारलं असता त्यांनी सांगितले, “माझ्या आईने दिलेला सल्ला मला विमानात आठवला आणि तोच मी स्टेटसच्या माध्यमातून मांडला. सशक्त लोकशाहीत स्वतःचं मत मांडणं चुकीचं नाही.”

पुन्हा एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस होणार का?
सद्यस्थितीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात असून, यंदाही दोन्ही गटांनी स्वतंत्र वर्धापन दिन साजरे केले. पुढील वर्षी एकसंघ पक्ष पाहायला मिळणार का, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुमची जी अपेक्षा आहे ती मी वरिष्ठांकडे पोचवेन. गेल्या २६ वर्षांत जे कोणी पक्षासाठी योगदान दिलं, ते सगळेच महत्त्वाचे आहेत.”

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे घरच्यांशी संवादाचा अभाव
गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे परदेशात होत्या. यासंदर्भात त्यांनी स्पष्ट केलं, “मी गेल्या पंधरा दिवसांपासून बाहेर होते, ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत देशाबाहेर होते. त्यामुळे घरच्यांशी बोलायलाही वेळ मिळाला नाही.”

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढील काळात एकात्मतेकडे वाटचाल होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सुप्रिया सुळे यांच्या भावना आणि वक्तव्यातून पक्षातील नात्यांचा उष्मा आणि भविष्यातील संभाव्य एकोपा स्पष्टपणे दिसतो.