May 18, 2025

पुण्यातील महाविकास आघाडीच्या बैठकीला शिवसेनेची दांडी

पुणे, १९ आॅक्टोबर २०२४ : महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून शिवसेना ठाकरे गट आणि काॅग्रेसच्या राज्यातील नेत्यांमध्ये शितयुध्द सुरू आहे. या शितयुध्दाचे परिणाम पुण्यातील महाविकास आघाडीच्या बैठकीवरही शनिवारी दिसून आले. काॅग्रेस भवन मध्ये बोलविण्यात आलेल्या बैठकीस शिवसेनेच्या दोन्ही शहर प्रमुखांनी दांडी मारली तर याबाबत विचारणा केली असता निरोप उशीरा मिळाल्याने जाता आले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात राज्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या वादामुळेच शिवसेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.

राज्यात विधानसभा निवडणूकांचे बिगूल वाजले असतानाच महाविकास आघाडीत जागा वाटपा वरून ताणाताणी सुरू आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागा वाटप पूर्ण झाले असून काही जागांवर तिढा असल्याचे सांगण्यात येत असले तरी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्द्व ठाकरे आणि काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाक्युध्द सुरू आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊतही काॅग्रेसवर सातत्याने तोंडसुख घेत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत या दोन्ही पक्षात वरिष्ठ पातळीवर वाद सुरू असल्याचे पडसाद स्थानिक पातळीवर पडत आहेत. शनिवारी काॅग्रेस भवन येथे महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी करण्यात येणारे शक्ती प्रदर्शन आणि प्रत्येक पक्षाकडून कशा प्रकारे प्रचाराचे नियोजन असेल, मेळावे, कार्यकर्ता बैठका कशा प्रकारे घ्यायच्या. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी इतर पक्षांच्या मतदारसंघात कशा प्रकारे प्रचारात सहभागी व्हायचे, प्रचार फेऱ्यांचे नियोजन कसे असावे यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविली होती. या बैठकीस काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहरातील स्थानिक नेते उपस्थित राहिले. मात्र, शिवसेनेच्या दोन्ही शहर प्रमुख उपस्थित राहिले नाहीत.

महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या रणनितीबाबत ही बैठक झाली, यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतली असून आठही उमेदवारांचे अर्ज शक्ती प्रदर्शन केले जाणार असून तीनही पक्षाचे मोठे नेते प्रचारात सहभागी होणार आहेत. त्यात, विरोधीपक्ष नेते राहूल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तसेच शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांचा समावेश आहे. याबाबत चर्चा झाली. – प्रशांत जगतप ( शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काॅग्रेस)

बैठकीचा निरोप उशीरा मिळाल्याने आपल्याला पोहचता आले नाही. तर संजय मोरे बाहेर् असल्याने बैठकीस जाऊ शकले नाहीत. – गजानन थरकुडे ( शहर प्रमुख, शिवसेना)