May 2, 2024

स्फोटक आयईडी बनवल्याप्रकरणी सहाव्या आरोपीला अटक, पुणे दहशतवादी इसिस मॉड्युल प्रकरण

पुणे, दि. ११/०८/२०२३: कोथरूड मध्ये पकडलेल्या दहशतवादी संबंधित आणखी एकाला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी ठाण्यातुन अटक केली आहे.स्फोटक आयईडी बनवल्याप्रकरणी त्याचा महत्वाचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. इसिस संघटनेच्या हिंदुस्थानांतील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा सक्रिय सहभाग असून या प्रकरणात एनआयएने केलेली ही सहावी अटक आहे.

शमील साकिब नाचन (रा. ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दहशतवादी कृत्यांसाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आइडी) च्या बनावट, प्रशिक्षण आणि चाचणीमध्ये त्याचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. तो दहशतवादी जुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादिर पठाण यांच्यासह इतर काही संशयित आरोपींच्या सहकार्याने काम करत होता. पुण्यात पकडलेले इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी हे ‘सुफा दहशतवादी टोळी’चे सदस्य असून ते एप्रिल २०२२ पासून फरार होते. एनआयएने एप्रिल 2022 मध्ये राजस्थानमधील कारमधून स्फोटके जप्त केल्याच्या प्रकरणात त्यांना ‘मोस्ट वॉन्टेड’ घोषित केले होते.

शमिलसह इसिस स्लीपर मॉड्यूलचे हे साथीदार पुण्यातील कोंढव घरातून कार्यरत होते. तिथे त्यांनी स्फोटक आयईडी एकत्र केले होते . त्याशिवाय गेल्या वर्षी बॉम्ब प्रशिक्षण आणि कार्यशाळा त्यांनी आयोजित केली होती. त्यांनी बनवलेल्या आयईडीची चाचणी घेण्यासाठी त्यांनी नियंत्रित स्फोटही घडवून आणला होता. देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडविण्याच्या उद्देशाने दहशतवादी कृत्ये करण्याची आरोपींचा डाव होता. इसिस अजेंड्याला पुढे नेण्यासाठी हिंदुस्तान सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याची योजना आखली होती. हिंसक कारवायांच्या माध्यमातून देशभरात दहशतवाद आणि हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवादी संघटनेच्या योजना हाणून पाडण्यासाठी एनआयए व्यापक तपास करत आहे