February 12, 2025

स्पोर्ट्स मॅनियाची एआरए एफसीवर पुन्हा मात

पुणे, २१/०१/२०२५: स्पोर्ट्स मॅनियाने स्पोर्ट्स एरिना टर्फ, वाकड येथे एआयएफएफ एलिट युथ लीगच्या एच गटातील लढतीत रविवारी एआरए एफसीचा २-१ असा पराभव करत विजयी पुनरागमन केले. या विजयासह स्पोर्ट्स मॅनियासाठी ‘दुहेरी विजया’ची (डबल विन) नोंद केली. त्यांनी अवे-लेग सामना याच फरकासह जिंकला होता.

स्पोर्ट्स मॅनियाचा एआरए एफसीविरुद्धचा विजय हा त्यांचा पाचवा विजय (६ सामने) होता. जानेवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र ओरांजे एफसीला २-१ असे हरवल्यानंतर त्यांचा घरच्या मैदानावरील (होम लेग) हा दुसरा विजय आहे.

स्पोर्ट्स मॅनियाला त्यांच्या शेवटच्या ‘अवे’ सामन्यात झिंक एफसीकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला होता. मात्र, होम ग्राऊंडवर रविवारी त्यांना सूर गवसला आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय खेचून आणला.

स्पोर्ट्स मॅनियाचे दोन्ही गोल निमेश पाठक (६०वे) आणि पृथ्वीराज पाटीलच्या (७१वे) माध्यमातून दुसऱ्या हाफमध्ये झाले.

एआरए एफसीकडून सम्राट चौहान (९०+६व्या मिनिटाला) अतिरिक्त वेळेत गोल करताना सामन्यात रंगत आणली. मात्र, स्पोर्ट्स मॅनियाने आघाडी कायम राखण्यात यश मिळवले.

दोन्ही संघांनी जशास तसा खेळ केल्याने मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात स्पोर्ट्स मॅनियाने आघाडी घेतली. आदित्य कांबळेने घेतलेल्या कॉर्नरवरून गोल झाला. त्याने पेनल्टी क्षेत्रात मारलेला चेंडू एआरए एफसीच्या गोलकीपर व्यवस्थित कलेक्ट करता आला नाही. त्याच्या हातून सुटलेल्या चेंडूवर नियंत्रण मिळवत बॉक्सच्या 6 यार्ड आत असलेल्या निमेशने (१-०) चेंडूला अचूक गोलजाळ्यात टाकले.

अकरा मिनिटांनंतर पृथ्वीराजने आघाडी २-० अशी वाढवली. आरिज शेखने डावीकडून सुरुवातीचा क्रॉस खेळला. ज्यावर पृथ्वीराजने धाव घेत नियंत्रण मिळवले. त्यानंतर पृथ्वीराजने पुढे जाणाऱ्या एआरए एफसीच्या गोलकीपरला चकवत गोल अप्रतिम गोल केला. पृथ्वीराजचा लीगमधील हा चौथा गोल आहे.

स्पोर्ट्स मॅनिया संघ २-० अशा फरकाने जिंकणार असे वाटत असतानाच एआरए एफसीच्या सम्राट चौहानने (९०+६) अतिरिक्त वेळेत गोल करताना प्रतिस्पर्ध्यांची आघाडी २-१ अशी कमी केली. वेदांत जैस्वालने उजवीकडून घेतलेला फ्री-किकवर गोलकीपर मो. जैनुलाबेद्दीन अडवला तरी त्यावर मिळालेल्या कॉर्नरवर सम्राटने अचूक हेडरने स्पोर्ट्स मॅनियाची बचावफळी भेदली.

या सामन्यात एआरए एफसीच्या अर्णव बक्सानीला ७५व्या मिनिटाला रेड कार्ड मिळाले. हेडरसाठी सरसावलेल्या निमेश पाठकला चुकीच्या पद्धतीने अडवल्याने रेफ्रिंनी त्याला मैदानाबाहेर पाठवले. त्यामुळे पाहुण्या संघाला शेवटच्या १५ मिनिटांत १० खेळाडूंसह खेळावे लागले.

एआरए एफसीविरूद्धच्या विजयासह स्पोर्ट्स मॅनियाने ६ सामन्यानंतर त्यांची गुणसंख्या १५वर नेली आणि लीगमध्ये अपराजित झिंक एफसी (१८ गुण) पाठोपाठ दुसरे स्थान पटकावले.