May 19, 2024

इलेक्ट्रिक तीन चाकी ऑटो रिक्षांकारिता पुणे म.न.पा मार्फत सहाय्य अनुदान

पुणे, 12 जून 2023: पुणे शहरातील पर्यावरण रक्षण व संवर्धन या साठी इलेक्ट्रिक वाहनांची महत्वाची भूमिका असून, हवा प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे इलेक्ट्रिक ऑटो रिक्षांकरीता अनुदान जाहीर करण्यात आले आहे.

पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत प्राप्त निधीतून प्रथम टप्प्यांत पहिल्या ५००० इलेक्ट्रिक रिक्षाना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पुणे शहरात ज्या ऑटो रिक्षांनी, इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा Electric (BOV), Three wheeler (passenger) 3WT या प्रकारामध्ये पुणे RTO कडे registration केले आहे,व जे रिक्षा मालक हा पुणे शहराचा रहिवासी आहे, अशा ऑटो रिक्षांना पुणे म.न.पा मार्फत सहाय्य अनुदान दिले जाणार आहे.प्रत्येकी रिक्षा र.रु. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार फक्त) चे अनुदान थेट लाभ हस्तांतरण – डी.बी.टी. पद्धतीने रिक्षा मालकाच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. हे अनुदान केवळ प्रवासी रिक्षांनाच दिले जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी पुणे महानगरपालिके च्या वेबसाईट https://dbt.pmc.gov.in वर रिक्षा मालकांनी आपले अर्ज भरुन, DBT स्कीम साठी इलेक्ट्रिक रिक्षा संबंधी सर्व माहिती भरायची आहे. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे – आर टी ओ रजिस्ट्रेशन (आर. सी .), लायसेन्स , बॅज , आधार कार्ड , पॅन कार्ड, , बँक खात्याची माहिती, फोटो इ . असून यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता व पडताळणी झाल्यानंतर प्रत्येकी र.रु. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार फक्त) चे अनुदान डी.बी.टी. पद्धतीने अर्जदाराच्या बॅक खात्यात जमा केले जातील.

पुणे महानगरपालीकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्जाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तरी अधिकाधिक इलेक्ट्रिक रिक्षा मालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व पुणे शहराचे प्रदूषण कमी करण्यासाठी सहाय्य करावे असे आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.