पुणे, ३ फेब्रुवारी २०२५ : पुणे महानगरपालिकेत समाविष्ट गावांमधील आरोग्य केंद्राचे भिजत घोंगडे पडले आहे. ही आरोग्य केंद्र मार्च पर्यंत महापालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच येथील गावच्या नागरिकांच्या आरोग्याची यामुळे हेळसांड होत असून तत्काळ मूल्यांकन करून संस्था महानगरपालिकेने घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्याचे काम करण्याच्या सूचनाही पवार यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच झाली. त्यावेळी पवार बोलत होते. शहराजवळील गावे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर हवेली, मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १८ उपकेंद्र महानगरपालिका हद्दीत आले. या केंद्रांचे स्थलांतराचा जिल्हा परिषदेने प्रस्ताव पाठविला होता, मात्र त्यावर शासनाकडून कुठलाही निर्णय झालेला नाही.
पुण्यात सध्या गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या समाविष्ट गावातील भागात अधिक असल्याने, येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र महानगरपालिकेकडे नाहीत. या भागात आरोग्याच्या संदर्भात काम करण्यास अडचणी येत असल्याचा मुद्दा काही लोक प्रतिनिधींनी उपस्थित केला. त्यावर पवार यांनी तत्काळ निर्णय घेऊन, मार्च महिन्यापर्यंत यावर निर्णय झालेला पाहिजे, असा आदेश जिल्हा परिषद आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिला.
अधिकाऱ्यांना जुमानत नाहीत केंद्रातील कर्मचारी
समाविष्ट गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून काही सूचना केल्या तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केंद्रामध्ये नियुक्ती असलेले अधिकारी, कर्मचारी जुमानत नसल्याचे प्रकार घडत असल्याचे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. सध्या धायरी, नांदेड, नांदोशी भागात जीबीएसचा प्रादुर्भाव असल्याने महापालिकेकडून लक्ष दिले जात नसल्याबाबत बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.
हस्तांतरित करण्याची गरज असलेली आरोग्य केंद्र
प्राथमिक आरोग्य केंद्रे : खडकवासला, फुरसुंगी, वाघोली
उपकेंद्रे – फुरसुंगी, उरुळी देवाची, वाघोली, लोहगाव, साडेसतरानळी, केशवनगर, मांजरी बुद्रूक, महादेवनगर, खडकवासला, धायरी, नऱ्हे, नांदेड, नांदोशी, शिवणे, उत्तमनगर, आंबेगाव, सूस, बावधन.
More Stories
पुणे: आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरवात…विद्यार्थ्यांचे औक्षण करून,साखर वाटून स्वागत
पुणे: राज्याचे माजी मंत्री तान्हाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण
अभिनेता राहुल सोलापूरकर यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य….