पुणे, १५ एप्रिल २०२५ : महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले आणि पावसाळी गटारे सफाई करण्याच्या निविदा या पूर्वगणनपत्रकापेक्षा १.३३ ते ५३.८५ टक्के कमी दराने आल्या आहेत. या निविदा लवकरच स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. पूर्वगणनपत्रक फुगविले जाते का, अशी शंका उपस्थित केली जात असून, त्याने या कामाचा दर्जा काय राहणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.
महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नाले व पावसाळी गटारे साफ करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील कचरा, वाढलेले गवत यासह पाण्याच्या प्रवाहात येणारे अडथळे काढण्यासाठी निविदा काढली जाते. त्याचप्रमाणे शहरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी गटारे टाकलेल्या असतात, त्यांचीदेखील सफाई करणे आवश्यक असते. या कामांच्या निविदा कोट्यवधी रुपयांच्या असतात. या वेळी मात्र ठेकेदारांनी १.३३ टक्के ते ५३.८५ टक्के इतक्या कमी दराने निविदा आल्या आहेत. या निविदा स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. महापालिकेच्या पूर्वगणनापेक्षा ५३ टक्के इतक्या कमी दराने या निविदा आल्याने संबंधित कामांच्या दर्जाबाबत आत्तापासूनच प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
पूर्वगणनपत्रक फुगविले जाते का?
शहरातील नालेसफाई करण्याच्या निविदा गेल्या तीन वर्षांपासून १० ते ५० टक्के कमी दराने येत आहेत. त्यामुळे या कामाचे पूर्वगणनपत्रक फुगविले जाते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ५० टक्के कमी दराने निविदा काढून ठेकेदारांना हे काम परवडते कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
निविदामध्ये रिंग झाल्याचा आरोप
नालेसफाईची काही निविदामध्ये रिंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निविदा ठरावीकच ठेकेदारांना मिळाल्या आहेत. या निविदामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाला असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
महापालिका प्रशासनाने घेतले ठेकेदाराकडून पत्र
बाणेर, कोथरूड, सिंहगड रस्ता या भागातील नाले आणि पावसाळी गटारे सफाई करण्याच्या निविदा पूर्वगणनपत्रकापेक्षा १.३३ टक्के कमी दराने आल्या होत्या. याच कामाचा काही ठिकाणी निविदा ५३ टक्के कमी दराने आल्या आहेत. त्यावर या निविदाची कामे मिळालेल्या ठेकेदाराकडून महापालिका प्रशासनाने ही कामे १२ टक्के कमी दराने करण्यास तयार असल्याचे लेखीपत्र घेतले आहे.

More Stories
Pune: पीएमपीएमएल कडून बसस्थानकांचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई
पुणे महापालिकेचे आरक्षण जाहीर अनेक प्रभाग उडाले तर महिला सुरक्षित
Pune: आरपीआयच्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी हिमाली कांबळे यांची निवड