पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२४: घरगुती वीजग्राहकांना मासिक ३६० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये पुणे परिमंडलात १३.७३ मेगावॅट क्षमतेचे २ हजार ७४८ छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून संबंधित घरगुती वीजग्राहकांचे मासिक वीजबिल देखील शून्यवत झाले आहे. तर आणखी ४६० छतावरील सौर प्रकल्पांचे काम वेगाने सुरु आहे.
घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे. या योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर करण्याची सूचना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार महावितरणकडून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजूरी देण्यासोबतच सौर नेटमीटर देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.
घरगुती व गृहसंकुलांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या आणि सुमारे २५ वर्ष मोफत वीज देणाऱ्या सूर्यघर योजनेत पुणे परिमंडल अंतर्गत आतापर्यंत घरगुती वीजग्राहकांचे १३ हजार ६७७ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे शहरात १३९१, पिंपरी चिंचवड शहरात ७७१ आणि मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांत ५८६ सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. घरगुती ग्राहकांनी या योजनेत अधिकाधिक संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी केले आहे.
या योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून गरजेपेक्षा वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून विकत घेण्यात घेत आहे व त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. तसेच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.
मंगळवारी रास्तापेठमध्ये प्रदर्शनी व प्रशिक्षण – महावितरण, ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ व ‘मास्मा’च्या संयुक्त सहकार्याने रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या आवारात मंगळवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची नागरिकांना माहिती देण्यासाठी प्रदर्शनी लावण्यात येणार आहे. योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध असलेल्या या प्रदर्शनीला नागरिकांना भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच महावितरणचे ३६० अभियंते व ५० एजन्सीचे प्रतिनिधी यांना सौर प्रकल्पांबाबत एक दिवसीय ९ सत्रांत विविध तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान