June 14, 2024

१६ ते १८ जून दरम्यान रंगणार भारतरत्न पं भीमसेन जोशी संगीत महोत्सव

पुणे, दि. १२ जून, २०२३ : कलाश्री संगीत मंडळ व द औंध सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवार दि. १६ जून ते रविवार दि. १८ जून दरम्यान भारतरत्न पं भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे १० वे वर्ष असून यावर्षी अभिजित गायकवाड यांचे विशेष सहकार्य महोत्सवाला लाभले आहे. औंध येथील पं भीमसेन जोशी कलामंदिर येथे तीनही दिवस सायं ५ ते रात्री १० या वेळेत सदर महोत्सव संपन्न होणार आहे. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल.

कलाश्री संगीत मंडळ यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा भारतरत्न पं भीमसेन जोशी पुरस्कार यावर्षी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबईचे रजिस्ट्रार प्रा विश्वास जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहे. रु. ११ हजार रोख, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शुक्रवार दि. १६ जून रोजी तो प्रदान करण्यात येईल.

सुप्रसिद्ध बासरीवादक पं केशव गिंडे यांचे शिष्य असलेले सिद्धांत कांबळे यांच्या बासरीवादनाने महोत्सवाला (शुक्रवार दि. १६ जून) सुरुवात होईल. यानंतर पं श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य असलेले किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं सुधाकर चव्हाण यांचे गायन होईल. पहिल्या दिवसाचा समारोप पं उल्हास कशाळकर यांच्या शिष्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी मंजुषा पाटील यांच्या गायनाने होईल.

भेंडीबाजार घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या शिष्या आणि प्रतिभावान गायिका किशोरी जानोरीकर आपल्या गायनाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची (शनिवार दि. १७ जून) सुरुवात करतील. यांतर तरुण पिढीचे आश्वासक वादक आणि पं शिवकुमार शर्मा यांचे शिष्य डॉ. शंतनू गोखले यांचे संतूरवादन होईल. यावेळी अनोख्या संतूर आणि तबला जुगलबंदीचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. पं जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व सुपुत्र शौनक अभिषेकी यांच्या गायनाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप होईल.

रविवार दि. १८ जून रोजी भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे नातू आणि श्रीनिवास जोशी यांचे शिष्य व पुत्र विराज जोशी यांचे गायन होईल. यानंतर पं केशव गिंडे यांचे शिष्य सुप्रसिद्ध बासरीवादक दीपक भानुसे आपले बासरीवादन प्रस्तुत करतील. यावेळी उपस्थितांना बासरी आणि तबला जुगलबंदी अनुभविता येईल. जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या गायनाने तिसऱ्या दिवसाचा व महोत्सवाचा समारोप होईल.

संपूर्ण महोत्सवात प्रभाकर पांडव, सुयोग कुंडलकर, अविनाश दिघे, उदय कुलकर्णी आणि गंगाधर शिंदे हे संवादिनी साथ करतील. तर भरत कामत, प्रशांत पांडव, पांडुरंग पवार, अविनाश पाटील, किशोर कोरडे, नंदकिशोर ढोरे, नीलेश रणदिवे, कार्तिक स्वामी, यश त्रिशरन हे तबलासाथ आणि गंभीर महाराज हे पखवाज साथ करतील. आकाश थिटे हे संपूर्ण महोत्सवाचे निवेदन करतील.