June 22, 2025

निवडणुकांचे बिगूल वाजले: पुण्यासह राज्यभरात चार सदस्याचा प्रभाग

पुणे, १० जून २०२५: राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले असून, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगरविकास विभागाने महापालिकांसाठी प्रभाग रचना करण्य़ाचे आदेश काढले आहेत. त्यानुसार, अ, ब, क वर्ग महापालिकांसाठी ४ सदस्यांचा प्रभाग असणार आहे. प्रभागाचे प्रारूप तयार करणे आणि सदस्यसंख्या निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर असणार आहे. नगरविकास विभागाकडून मंगळवारी याबाबतचे आदेश काढण्य़ात आले आहेत. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे.

या प्रभाग रचनेसाठी सप्टेंबर २०२२ मध्ये निश्चित केलेली कमाल आणि किमान सदस्य संख्या कायम असणार आहे. शासनाच्या या आदेशानुसार राज्यातील अ वर्गातील पुणे आणि नागपूर, तर ब वर्ग असलेल्या ठाणे, नाशिक आणि पिंपरी-चिंचवड, तर क वर्ग असलेल्या नवी मुंबई, वसई- विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबविली महापालिकांचा समावेश आहे. ड वर्गातील १९ महापालिकांचा समावेश आहे. ही प्रभाग रचना करण्यासाठी शासनाकडून नियामवली देण्यात आली असून, त्यानुसारच प्रभाग रचना करणे अपेक्षित आहे. त्यासाठी नजीकच्या जाहीर झालेल्या लोकसंख्येचा आधार घेतला जाणार आहे. त्यानुसार प्रारूप प्रभाग रचना करून महापालिका आयुक्तांनी ती निवडणूक आयोगास सादर करायची आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्याच्या सूचना सर्व आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

शेवटचा प्रभाग ३ किंवा ५ सदस्यांचा
प्रभाग निश्चित करताना सदस्यसंख्या सप्टेंबर २०२२ च्या आदेशाप्रमाणे असणार आहे. या आदेशात कमाल आणि किमान किती सदस्य असावेत, हे निश्चित केले आहे. मात्र, त्याच वेळी सर्व प्रभाग चार सदस्यांचे करायचे असून, ते होत नसल्यास एक प्रभाग तीन सदस्यांचा, तर एक प्रभाग ५ सदस्यांचा करायचा आहे. दोन प्रभाग प्रत्येकी ३ सदस्यांचे करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, ती करताना भौगोलिक सलगता राखणे, नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रभागाची लोकसंख्या निश्चित करण्याचे निकषही महापालिकेस देण्यात आले आहेत. प्रभाग रचना उत्तरेकडून सुरू करून ती उत्तर पूर्वेकडून पश्चिम आणि शेवट दक्षिणेकडे करण्याच्या सूचना आहेत, तर सीमारेषा मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर रस्ते, रेल्वे रूळ, फ्लाय ओव्हर अशा मर्यादा घेऊन निश्चित केल्या जाणार आहेत. प्रभागांचे नकाशे गुगल मॅपवर तयार केले जाणार आहेत.

असा असतील प्रभाग रचनेचे टप्पे
– प्रारूप प्रभाग रचना करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यते पाठविणे – महापालिका आयुक्त
– प्रारूप रचनेस मान्यता देणे- राज्य निवडणूक आयुक्त
– प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे – महापालिका आयुक्त
– प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना घेणे – प्राधिकृत अधिकारी
– अंतिम प्रस्ताव निवडणूक आयोगास पाठविणे – प्रधिकृत अधिकारी (आयुक्तांच्या मार्फत)
– अंतिम रचनेस मान्यता देणे – निवडणूक आयोग
– अंतिम रचना जाहीर करणे – महापालिका आयुक्त