July 22, 2024

‘दी केरला स्टोरीज’ चित्रपटाने आज समाजमन जागृत केले – दिग्दर्शक सुदिप्तो सेन

पुणे, दि. २० मे, २०२३ : आपल्या देशात स्वप्नरंजनासाठी चित्रपट पहायला हवेत हे गेली ५०-६० वर्षे जाणूनबुजून रुजविण्यात आले आहे. आपली जी स्वप्ने सत्यात उतरत नाहीत ती चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवा, असे सांगण्याचा हा प्रयत्न होता. म्हणूनच भारतात चित्रपट हे समाजमन बदलविण्यात असमर्थ ठरल्याचे दुर्दैवाने दिसून येते. याला देशातील राजकारण अनेक अंशी जबाबदार आहे. मात्र आमच्या चित्रपटाने आज देशाचे समाजमन जागृत केले आहे, असे मत ‘दी केरला स्टोरीज’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी व्यक्त केले. कर्वे नगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील स्कूल ऑफ मीडिया ॲक्टीव्हिटी, रिसर्च अँड टेक्नलॉजी अर्थात ‘स्मार्ट’ या विभागातील ‘स्मार्ट टॉकीज’ या आधुनिक प्री व्ह्यू थिएटरचे उद्घाटन सेन यांच्या हस्ते आज पुण्यात झाले त्यावेळी ते बोलत होते.

‘दी केरला स्टोरीज’ चित्रपटाचे निर्माते विपुल शाह, मुख्य अभिनेत्री अदा शर्मा, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव, सचिव डॉ पी व्ही एस शास्त्री, विश्वस्त मिलींद लेले, स्कूल ऑफ मीडिया ॲक्टीव्हिटी, रिसर्च अँड टेक्नलॉजी विभागाच्या संचालिका राधिका इंगळे, विभागाचे समन्वयक देवदत्त भिंगारकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

स्मार्ट स्कूल ऑफ मीडिया ॲक्टीव्हिटी, रिसर्च अँड टेक्नलॉजी (स्मार्ट) विभागाच्या विद्यार्थीनींसाठी आज उद्घाटन करण्यात आलेले प्री व्ह्यू थिएटर हे शिक्षण संस्थेत असलेले अशाप्रकारचे शहरातील पहिलेच थिएटर आहे. यावेळी स्मार्ट आणि शहरातील ‘मिती फिल्म सोसायटी’ यांच्यासोबत एक सामंजस्य करार देखील करण्यात आला. या अंतर्गत स्मार्टच्या  विद्यार्थीनींना उत्तमोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहण्याची व प्रत्यक्ष काम करण्याची संधी देखील मिळेल. ‘स्मार्ट’तर्फे माध्यम क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थीनींसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेला ‘बी- व्होक मीडिया अँड एन्टरटेंन्मेट’ हा पदवी अभ्यासक्रम राबविला जातो.

यावेळी बोलताना सेन म्हणाले, “कलेमध्ये समाजमन  बदलविण्याची आणि ते घडविण्याचीही क्षमता असते. चित्रपट हा सामाजिक बदलांमध्ये महत्त्वाचे आणि  प्रभावी साधन म्हणून काम करतो. युरोपियन रेनेसांमध्ये लिओनार्डो दा विंची, मायकल एंजलो या सारख्या कलाकारांनी देखील आपल्या कलेच्या माध्यमातून बदलांचे साक्षीदार होण्याचे प्रयत्न केले. रशियन राज्यक्रांतीमध्ये देखील आपल्याला अशी उदाहरणे दिसून येतात. आज अशाच प्रकारे एका महत्त्वाच्या विषयावर नागरिकांना जागरूक करण्याचे काम आमच्या चित्रपटाच्या माध्यमातून होताना दिसत आहे, याचा आम्हाला आनंद आहे.”

ते पुढे म्हणाले की, “सात वर्षे चित्रपटाविषयी संशोधन करताना सुरुवातीला मला हा विषय एक सामाजिक प्रश्न वाटला होता, मात्र जसेजसे अधिक संशोधन केले तसे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक संवेदनशील मुद्दा असल्याचे माझ्या निदर्शनास आले. जास्तीत जास्त मुली व महिलांनी हा चित्रपट पाहावा आणि याविषयी सतर्क राहत जनजागृती करावी.”

चित्रपट किती कोटींची कमाई करतोय हे आमच्यासाठी महत्त्वाचे नसून किती कोटी नागरिक चित्रपट पाहतायेत हे महत्त्वाचे आहे. आजमितीला दीड ते दोन कोटी नागरीकांनी हा चित्रपट पाहिला असून परदेशातही चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला हा मुद्दा पटो न पटो पण तो संवेदनशील असल्याने तुम्हाला त्याविषयी जाणून घ्यायला हवे असेही सेन यावेळी म्हणाले.

जास्तीत जास्त मुलींनी हा चित्रपट पाहत इतरांनाही या मुद्द्याविषयी जागृत करावे असे आवाहन यावेळी अदा शर्मा यांनी केले. राधिका इंगळे यांनी प्रास्ताविक केले तर देवदत्त भिंगारकर यांनी आभार मानले. यानंतर संस्थेतील विद्यार्थीनींसाठी ‘दी केरला स्टोरीज’ चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग करण्यात आले.