पुणे, दि. १६/१०/२०२४: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक प्रक्रियेमध्ये माध्यम कक्षाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडताना मतदार संघनिहाय माध्यम कक्ष समन्वय अधिकाऱ्यांनी निरपेक्ष व पारदर्शकपणे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघातील माध्यम कक्ष समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, माहिती अधिकारी सचिन गाढवे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे सहायक प्राध्यापक योगेश बोराटे, सहायक संचालक जयंत कर्पे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, जनमानसामध्ये प्रशासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे काम माध्यम कक्षामार्फत केले जाते. निवडणूक प्रक्रियेत माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती खूप महत्त्वाची असून या समितीमार्फत राजकीय पक्ष, उमेदवार यांना सर्वच माध्यमांद्वारे जाहिरात प्रसारणासाठी पूर्व परवानगी दिली जाते. तालुका स्तरावरील माध्यम कक्षांनी पेड न्यूज, वृत्त वाहिन्यावरील जाहिराती, मतदारांची दिशाभूल करणाऱ्या समाज माध्यमांवरील पोस्टवर बारकाईने लक्ष देणे, निवडणूक प्रक्रियेविषयी चुकीची माहिती पसरवणाऱ्या वृत्तांचे तात्काळ खंडन करणे, राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे व्यक्तिगत चारित्र्य हनन, समाजामध्ये द्वेष, तेढ निर्माण करणाऱ्या अथवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोस्ट, बातम्या, प्रचारावर लक्ष ठेऊन त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हास्तरीय माध्यम कक्षाच्या निदर्शनास आणून देणे तसेच चुकीच्या बातम्यांचे तातडीने निराकरण करावे आणि त्यावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचनाही डॉ. दिवसे यांनी दिल्या.
ते म्हणाले, निवडणूक प्रक्रियेवर भारत निवडणूक आयोगाचे बारकाईने लक्ष असते. निवडणूक प्रक्रिया महत्त्वाचे कार्य असून या प्रक्रियेत वैयक्तिक हितसंबंधाला महत्त्व देता कामा नये. जिल्ह्यात ८७ लाख मतदार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाचे जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. सर्व अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा बारकाईने अभ्यास करुन जागरुकपणे आपापली जबाबदारी पार पाडावी, असेही ते म्हणाले.
जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार माध्यम कक्षाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांच्या प्रचार-प्रसिद्धीच्या खर्चावर जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीमार्फत नियंत्रण ठेवण्यात येते. या समितीमार्फत जाहिरातींच्या प्रसारणासाठी पूर्व प्रमाणिकरण आवश्यक असून राजकीय पक्षांना सर्वच माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी या समितीमार्फत पूर्व परवानगी दिली जाते असे सांगून सर्व विधानसभा मतदार संघ स्तरीय माध्यम कक्षाच्या अधिकाऱ्यांनी पेड न्यूज व समाजमाध्यमांवरुन प्रसारित होणाऱ्या संदेशांबाबत सतर्क रहावे असे आवाहन केले. बैठकीला माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती सदस्य आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विक्रांत मंडपे व दैनिक सकाळचे पत्रकार अनिल सावळे तसेच विधानसभा मतदार संघाचे माध्यम कक्षांचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.
More Stories
पुणे मेट्रोच्या ताफ्यात लवकरच नवीन १२ मेट्रो ट्रेन सेट
पुणे: जवानाच्या वेळीच धाव घेतल्याने टळली दुर्घटना; खिडकीत अडकलेल्या चार वर्षाच्या मुलीचे वाचवले प्राण
पुणे: महापालिका आयुक्त गेले आणि उघड झाली स्वच्छतेची सगळी पोलखोल; ५५ कोटींचा प्रस्तावही फेटाळला