March 21, 2025

महाराष्ट्र चित्पावन संघाच्या वतीने योगेश्वरी पुरस्कार जाहीर

पुणे, दि. १६ ऑक्टोबर, २०२४ : महाराष्ट्र चित्पावन संघाच्या वतीने देण्यात येणारा योगेश्वरी पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध व्याख्यात्या डॉ धनश्री लेले यांना जाहीर करण्यात आला आहे. संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून येत्या शनिवार दि २६ ऑक्टोबर रोजी सायं ५ वाजता टिळक स्मारक मंदिर येथे सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र चित्पावन संघाच्या कार्यवाह सुप्रिया दामले यांनी दिली.

राज्यातील सुप्रसिद्ध पु. ना. गाडगीळ पेढीच्या वैशालीताई गाडगीळ यांच्या हस्ते सदर पुरस्कार डॉ लेले यांना प्रदान करण्यात येईल. रु ११ हजारचा धनादेश, श्री योगेश्वरी देवीचा टाक असलेली फ्रेम व महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे, असेही दामले यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘मानवंदना’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध संवादिनी आणि ऑर्गन वादक पं. गोविंदराव पटवर्धन यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि स्वरगंधर्व बाबूजी – अर्थात सुधीर फडके यांना सांगीतिक अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये या दोघांचे किस्से, आठवणी व गाणी यांची सुरेल मैफल रसिक प्रेक्षकांना अनुभविता येणार आहे.

कार्यक्रमामध्ये आदित्य ओक, विघ्नेश जोशी, कल्याणी जोशी, अश्विनी वझे, अमित कुंटे आणि ऑस्करला नामांकन मिळालेल्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या सिनेमात सुधीर फडके यांची भूमिका अजरामर करणारे सुप्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे हे कलाकार सहभागी होतील. सदर कार्यक्रम हा सशुल्क असून कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका दि. १८, १९ व २० ऑक्टोबर रोजी घरकुल लॉन्स येथे होणाऱ्या चित्पावन संघाच्या प्रदर्शन स्थळी आणि त्यानंतर महाराष्ट्र चित्पावन संघाच्या टिळक रस्त्यावरील कार्यालयात उपलब्ध होऊ शकणार आहेत याची कृपया नोंद घावी.