May 9, 2024

यावर्षीचा निळू फुले कृतज्ञता सन्मान सुमीत राघवन यांना जाहीर

पुणे, दि. २७ एप्रिल, २०२४ : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा निळू फुले कृतज्ञता सन्मान यावर्षी सुप्रसिद्ध अभिनेते सुमीत राघवन यांना जाहीर झाला आहे. रविवार दिनांक ५ मे रोजी मयूर कॉलनी, कोथरूड येथील बालशिक्षण प्रशालेच्या एमईएस सभागृहात संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ख्यातनाम अभिनेते – दिग्दर्शक सचिन खेडेकर यांच्या हस्ते सदर सन्मान सुमीत राघवन यांना प्रदान करण्यात येईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल. कार्यक्रमस्थळी काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी.

निळू फुले यांच्यासारख्या महान कलाकाराला आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने मागील वर्षीपासून सदर कृतज्ञता सन्मान सोहळा सुरु करण्यात आला असून यंदा या सन्मान सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. रोख रुपये २१ हजार, उपरणे, गांधी टोपी आणि रोप असे या सन्मानाचे स्वरूप आहे.

याविषयी अधिक माहिती देताना बेलवलकर संस्कृतिक मंचाचे अध्यक्ष समीर बेलवलकर म्हणाले, “निळू फुले यांसारख्या दिग्गज कलाकाराप्रती आदर व्यक्त करणे, यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देणे आणि नव्या पिढीला त्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने आम्ही हा पुरस्काराचा उपक्रम राबवितो आहोत. प्रमुख पाहुण्यांपेक्षा मागील वर्षीच्या सन्मानार्थीने यावर्षीच्या सन्मानार्थीला सन्मानित करावे आणि ही परंपरा अशीच पुढे चालावी या कल्पनेने मागील वर्षीचे कृतज्ञता सन्मान सन्मानार्थी सचिन खेडेकर यांच्या हस्ते आम्ही यावर्षी सुमीत राघवन यांचा सन्मान करीत आहोत.”

प्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार  राजेश दामले यांच्या संकल्पनेतून साकारात असलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ‘एका पावसात’ या विशेष कार्यक्रमाने होईल. यामध्ये निळू फुले यांच्या कन्या व अभिनेत्री गार्गी फुले थत्ते आणि सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांचा कवितांचा कार्यक्रम होईल. यानंतर सचिन खेडेकर यांच्या हस्ते सुमीत राघवन यांचा सन्मान करण्यात येईल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात राजेश दामले हे सुमीत राघवन यांची मुलाखत घेतील.