May 6, 2024

सादर होणार पुणे शहराचा नृत्य विषयक लेखाजोखा…

पुणे, दि. २६ एप्रिल, २०२४ :  देशव्यापी पटलावर पुणे शहराचे नृत्यामधील स्थान, येथे होऊन गेलेल्या आणि असलेल्या कलाकारांचे नृत्य क्षेत्रातील योगदान, अनेक नृत्यप्रकारात शहरात होत असलेले प्रयोग आदी सर्व विषयांवर प्रकाश टाकणाऱ्या आणि पुणे शहराचा नृत्य विषयक लेखाजोखा मांडणाऱ्या ‘अटेन्डन्स’ या वार्षिक पुस्तिकेचे प्रकाशन येत्या मंगळवार दि. ३० एप्रिल रोजी सायं ६ वाजता टिळक रस्त्यावरील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात संपन्न होणार आहे.

शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था आणि ज्येष्ठ नृत्य अभ्यासक आशिष मोहन खोकर यांच्या वतीने आयोजित सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल.

‘अटेन्डन्स’ या वार्षिक पुस्तिकेचे संपादक स्वत: ज्येष्ठ नृत्य अभ्यासक आशिष मोहन खोकर हे असून यावर्षीचा अंक त्यांनी पुण्यातील नृत्याला आणि कलाकारांना समर्पित केला आहे हे विशेष. शुभी प्रकाशन यांनी या अंकाचे प्रकाशन केले असून पुण्यातील कथक नृत्य कलाकार आणि लाऊड अपलॉज या नृत्यावर आधारित मासिकाच्या संपादिका नेहा मुथियान यांनी सह संपादक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

दि. ३० एप्रिल रोजी उन्नत भारत अभियानाचे अध्यक्ष, नालंदा विद्यापीठाचे माजी कुलगुरू पद्मभूषण डॉ विजय भटकर यांच्या हस्ते ‘अटेन्डन्स’ या वार्षिक पुस्तिकेचे प्रकाशन होईल. स्वत: आशिष मोहन खोकर यांसोबतच भरतनाट्यम गुरु डॉ सुचेता भिडे चापेकर, संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या कथक गुरु शमा भाटे, कथक गुरु मनीषा साठे यावेळी आवर्जून उपस्थित असतील.

पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभानंतर पुणे शहरातील पाच प्रमुख नृत्यकलाकार असलेल्या अरुंधती पटवर्धन, रसिका गुमास्ते, प्राजक्ता अत्रे, लीना केतकर आणि मंजिरी कारुळकर या आपल्या शिष्यांसोबत ‘ऋतूभेदम’ हा नृत्याचा कार्यक्रम प्रस्तुत करतील.