September 10, 2024

महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टीव्हलमध्ये विदित गुजराथी, रौनक साधवानी यांची विजयी सलामी

नागपूर, 1 जून 2023: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टीव्हलमध्ये चॅलेंज लढतीत विदित गुजराथी आणि रौनक साधवानी यांनी अनुक्रमे पीटर स्वीडलर आणि नायजेल शॉर्ट यांना पराभूत करताना विजयी सलामी दिली.

नागपूरमधील नैवेद्यम नॉर्थस्टार संकुलात आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत चॅलेंज लढतीत विदित गुजराथीने पीटर स्वीडलर विरुध्द 30चालीमध्ये विजय मिळवताना 16 सामन्यांच्या लढतीत 3-0 अशी आघाडी घेतली. या लढतीमध्ये चार क्लासिकल, चार रॅपिड आणि आठ ब्लिट्स सामन्यांचा समावेश आहे. गेल्या काही काळातील ही आपली सर्वोत्तम कामगिरी असल्याचे विदित याने यावेळी सांगितले.

रौनक साधवानी याने नायजेल शॉर्टवर 28 चालीमध्ये मात करताना 3 गुणांची आघाडी मिळवुन या संपूर्ण लढतीत वर्चस्व गाजवले.

याआधी विदित याने स्वीडलर विरुध्द इंग्लिश ओपनिंगने डावाची सुरुवात करताना सातव्या चालीतच वजिरा वजिरी करुन प्रतिस्पर्ध्याला चकित केले. विदीत याने वजिराच्या बाजूला कॅसलिंग केल्यामुळे त्याची आक्रमक भूमिका कायम राहिली. त्यानंतर 15व्या चालीत प्यादाचा बळी देऊन विदित याने स्वीडलरच्या राजाला कोंडीत पकडले. स्वीडलरने 19व्या चालीला उंटाच्या बदल्यात हत्तीचा बळी देऊन आक्रमण रोखले. परंतु विदितने राजाच्या बाजुची प्यादी पुढे सरकवताना स्वीडलरला कोंडीत पकडले. स्वीडलरने 30व्या चालीत शरणागती पत्करली.

स्पर्धेत केवळ 11वर्षे वयाच्या एथान वाझ याने पहिल्याच फेरीत बारावा मानांकित स्पार मिलोज याला बरोबरीत रोखून खळबळजनक निकाल नोंदवला. तसेच भारताच्या अनिरुध्द चॅटर्जी याने पंधराव्या मानांकित अँटोनियो दिकुना याला बरोबरीत रोखून विजयी सुरुवात केली. अन्य एका निकाली लढतीत द्वितीय मानांकित झाकरतसोव्ह व्हाय चेसलाव्ह याने किंग इंडीयन बचवाच्या साहाय्याने उत्कृष्ट आक्रमण करताना भारताच्या अंजनेयवर 37चालीत विजय मिळवला.

तत्पूर्वी नायजेल शॉर्ट याने 58वा वाढदिवस साजरा करताना राजाच्या बाजूचे प्यादे पुढे सरकवून डावाचा प्रारंभ केला तर रौनक याने सिसी लियन बचावाने त्याला उत्तर दिले.

दुसऱ्या ग्रँडमास्टर खुल्या स्पर्धेत 2103 एलो रेटिंग असलेल्या पाचव्या मानांकित ग्रँडमास्टर जी आकाश याला पराभूत करून अनपेक्षित निकाल नोंदवला. 12 वर्षाखालील राष्ट्रीय वेईजत्या गौतम कृष्णा याने अकराव्या मानांकित ग्रँडमास्टर फेड्रोव्ह अलेक्सीचा पराभव केला. अर्जुन तिवारी याने नवव्या मानांकित जीएम वोरोबिव्हो एव्हेग्नीला बरोबरीत रोखले. स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार अजय संचेती, आमदार व माजी क्रिडा मंत्री सुनील केदार, भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, फिडे एडव्हायजरी कमिटीचे चेअरमन भरतसिंग चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके, उपाध्यक्ष गिरीश व्यास, मानद सचिव निरंजन गोडबोले, चेस असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष निशांत गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: चॅलेंजर लढत: पहिली फेरी:
जीएम विदित गुजराथी(2731)(3गुण)वि.वि.पीटर स्वीडलर(2683)(0गुण);
जीएम नायजेल शॉर्ट(2597)(0गुण)पराभुत वि.रौनक साधवानी(2627)(3गुण);

ग्रँडमास्टर खुली स्पर्धा: पहिली फेरी:
हर्षित पवार (0) पराभुत वि.जीएम बोरिस सावचेन्को(1);
जीएम झाखार्त्सोव्ह वायचेस्लाव (1)वि.वि.अंजनेया फाटक(0);
अरविंदर प्रीत सिंग (0) पराभुत वि.जीएम पायचडझे लुका (1);
जीएम व्लादिमीर बर्माकिन (1)वि.वि.आयएम अनुप देशमुख(0);
आर्य भक्त (1)वि.वि.जीएम आकाश जी (0);
किशन गंगोली (0)पराभुत वि.जीएम एमआर वेंकटेश (1);
जीएम अलेक्सद्रोव्ह अलेक्सेज (1)वि.वि.केदार मोर्वेकर (0);
अर्जुन तिवारी (0.5) बरोबरी वि.जीएम व्होरोबीव्ह एव्हगेनी (0.5);
आयएम नितीश बेलूरकर (0) पराभूत वि.कैवल्य नागरे(1);
आयएम सेझपार मिलोसेज(0.5)बरोबरी वि. एथान वाझ(0.5);
श्रेयस पय्यापत (0.5)बरोबरी वि.आयएम नीलाश साहा (0.5) ;
अनिरुद्ध चॅटर्जी ( 0.5)बरोबरी वि. आयएम वियानी अँटोनियो दिकूना(0.5) ;