July 8, 2025

पुणे महापालिकेत समाविष्ट गावांना विकासात्मक न्याय देणार: मंत्री उदय सामंत

मुंबई, ३ जुलै २०२५: पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या लगतच्या ३२ गावांसाठी पुणे महापालिका आणि पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या माध्यमातून विकास आराखडा तयार केला जात असून, या गावांना पायाभूत सुविधा देऊन विकासात्मक न्याय दिला जाईल, असे स्पष्ट मत नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत व्यक्त केले.

सदस्य योगेश टिळेकर यांनी या ३२ गावांचा समावेश झाल्यानंतर पुणे महापालिकेचे विभाजन करून पूर्व पुण्यासाठी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्याची सूचना मांडली होती. यावर उत्तर देताना मंत्री सामंत यांनी या गावांच्या विकासासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

ते म्हणाले, “पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ३२ पैकी ११ गावांसाठी महापालिकेमार्फत विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, त्याची मुदत संपल्यामुळे सध्या शासनाच्या स्तरावर पुढील कार्यवाही सुरू आहे. उर्वरित २३ गावांसाठी पीएमआरडीएमार्फत विकास आराखडा तयार केला जात आहे.”

या गावांमध्ये पाणीपुरवठा, वीज, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण प्रकल्प यांसारख्या सुविधा पुरविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.