मुंबई, ३ जुलै २०२५: राज्यातील प्रमुख नद्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी सरकारने तीन टप्प्यांत प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला असून, पिंपरी-चिंचवड, पुणे आणि परिसरातील पवना, इंद्रायणी, मुळा-मुठा नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे संपूर्णपणे शुद्धीकरण करण्यासाठी हे प्रकल्प राबवले जात आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषद सदस्य श्रीमती उमा खापरे यांनी पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सदस्य सचिन अहिर यांनीही उपप्रश्न उपस्थित केला.
या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, “इंद्रायणी आणि पवना नदी प्रकल्पांचा एकूण खर्च ₹६७१ कोटी असून, यामध्ये ६० टक्के निधी केंद्र सरकारकडून आणि ४० टक्के पीएमआरडीएकडून दिला जाणार आहे. पवना नदी प्रकल्पासाठी स्वतंत्रपणे ₹२१८ कोटींचा निधी असून, त्याचेही वाटप केंद्र आणि स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात येईल. तसेच औद्योगिक सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी एमआयडीसीमार्फत सुरू असलेल्या सीईटीपी प्रकल्पाचा खर्च ₹१२०० ते ₹१५०० कोटी इतका आहे.”
या संपूर्ण प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेची मदत घेण्यात येत असून, जपानी संस्थेच्या (जायका) माध्यमातून कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू आहे व त्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, असेही सामंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच आळंदी येथे झालेल्या कार्यक्रमात “इंद्रायणी-पवना नद्यांचे उगमपासून संगमापर्यंत संपूर्ण शुद्धीकरण करण्यात येणार आहे,” असे जाहीर केले असल्याचेही सामंत यांनी नमूद केले. या प्रकल्पाच्या प्रगतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच संबंधित तीन विभागांची बैठक घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
More Stories
पुणे: हिंजवडीसह सात गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आदेश; उपमुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मागवला
तब्बल २० वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र; महाराष्ट्रातील शाळांवर हिंदी लादण्यास विरोध
पुणे महापालिकेत समाविष्ट गावांना विकासात्मक न्याय देणार: मंत्री उदय सामंत