October 14, 2025

पुणे मेट्रो लाईन ३ साठी २० जूनपासून ‘थर्ड रेल’ विद्युतीकरण कार्यान्वित होणार

पुणे, दिनांक १८ जून २०२४: हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पीएमआरडीए प्रणित पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पामध्ये विद्युतपुरवठ्यासाठी अत्याधुनिक ‘थर्ड रेल सिस्टिम’चा वापर केला जाणार आहे. ‘पुणेरी मेट्रो’च्या एकूण कामाने एक शाश्वत गती प्राप्त केली आहे. त्याचाच पुढील भाग म्हणून मेट्रो लाईन ३ साठी येत्या गुरूवार दिनांक २० जून पासून ‘थर्ड रेल’ प्रणालीचे विद्युतीकरण प्रत्यक्ष कार्यान्वित केले जाणार आहे. त्या अंतर्गत हिंजवडी येथे ३३००० व्हॉल्ट, ५० हर्टझ् एसी पॉवर केबल आणि ७५० व्हॉल्ट डिसी थर्ड रेल ट्रॅक्शन प्रणालीची प्रत्यक्ष वीजपुरवठा यंत्रणा कार्यान्वित केली जाईल.

सर्व प्रकारची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी या भागात अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही कारणास्तव विद्युत क्षेत्राजवळ जाण्यास किंवा कसलेही काम करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. त्यानुसार या परिसरातील सर्व नागरीकांनी तसेच कर्मचाऱ्यांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पुणेरी मेट्रोच्या विकसकांनी केले आहे.

थर्ड रेल विद्युतीकरण विभाग तपशील

लाईन: पुणे मेट्रो लाईन ३ (पिंक लाईन)
विद्युतीकरणाची तारीख: २०.०६.२०२४
घटक: ३३ केव्ही एएसएस आणि टीएसएससह ३३ केव्ही केबल ७५० व्हीडीसी थर्ड रेल ट्रॅक्शन सिस्टीमसह ७५० व्हीडीसी चाचणी ट्रॅकच्या ७५० व्हीडीसी केबलसह हिंजवडी डेपोमध्ये IBL- १ ची ७५० व्हीडीसी स्टिंगर प्रणाली.

सुरक्षा प्रथम धोरण

नागरिकांच्या सोयीसाठी हाती घेण्यात आलेल्या पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाच्या सर्व टप्प्यांमध्ये गुणवत्ता आणि सुरक्षिततेशी कुठलीही तडजोड न करण्याचे टाटा समूहाचे धोरण आहे. पुणेरी मेट्रोचे कामकाज सुरक्षित आणि कार्यक्षमतेने चालावे यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रकल्प विकसकांनी सर्व व्यक्तींना सुरक्षिततेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि विद्युतीकरण झालेल्या भागात अनधिकृत प्रवेश टाळण्याचे आवाहन केले आहे.

पुणे मेट्रो लाईन ३ बाबत माहिती:

पुणे मेट्रो लाईन ३ हा हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा २३ किमीचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्प आहे, जो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) द्वारे टाटा समूहाच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (TUTPL) आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स (Siemens Project Ventures GmbH) यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमला प्रदान करण्यात आला आहे. हा प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनी द्वारे ३५ वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे.