September 9, 2024

३४९ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची १०० फुटी कागदी प्रतिमा

पुणे, दि. ६ जून २०२३: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४९ व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत हडपसर येथील अमनोरा मॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तब्बल १०० फूट कागदी प्रतिमा साकारण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे आणि सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांच्या संकल्पनेतून ही प्रतिमा साकारण्यात आली आहे. महाराजांची ही भव्यदिव्य कागदी प्रतिमा उद्देश पघळ आणि ऋतुजा घुले या दोन कलाकारांनी साकारली असून यासाठी त्यांना केवळ १२ तास इतका वेळ लागला. साडेसतरानळी गावचे उपसरपंच आणि शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष रुपेश तुपे यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या १०० फूट प्रतिमेसाठी तब्बल ५० हजार घोटीव कागदी तुकड्यांचा वापर करण्यात आला आहे. यासाठी ४ इंच बाय ४ इंच आकाराच्या कागदांचा वापर करण्यात आला. तर पूर्ण प्रतिमा साकारण्यासाठी १२ तास इतका वेळ लागला. पुणे शहरात अशाप्रकारची शिवरायांची प्रतिमा पहिल्यांदाच साकारण्यात आली आहे हे विशेष.

गुरुवार ८ जूनपर्यत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत संपूर्ण दिवस अमनोरा मॉल, हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची ही १०० फूटी कागदी प्रतिमा नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असेल अशी माहिती रुपेश तुपे यांनी दिली.