January 5, 2026

रेलवन ॲपद्वारे अनारक्षित तिकीट बुकिंगवर डिजिटल पेमेंट केल्यास ३ टक्के सवलत

अमित सिंह
पुणे / नवी दिल्ली, ३० डिसेंबर २०२५ : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेत रेलवन (RailOne) मोबाईल ॲपद्वारे अनारक्षित तिकिटांचे बुकिंग करताना डिजिटल पेमेंट केल्यास ३ टक्के लाभ देण्याची योजना लागू केली आहे. रेलवन ॲपवर उपलब्ध असलेल्या सर्व डिजिटल पेमेंट माध्यमांवर ही सवलत लागू राहणार असून, आर-वॉलेटद्वारे करण्यात येणाऱ्या व्यवहारांसाठीची विद्यमान कॅशबॅक योजना कायम राहणार आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनारक्षित प्रवासासाठी डिजिटल तिकीट व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवासी अनारक्षित डब्यांचा वापर करतात आणि अशा प्रवाशांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

अनारक्षित प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ

रेल्वेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मागील पाच वर्षांत सामान्य व अनारक्षित डब्यांमधील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
२०२०–२१ (कोरोनाचा काळ) : ९९ कोटी प्रवासी
२०२१–२२ : २७५ कोटी प्रवासी
२०२२–२३ : ५५३ कोटी प्रवासी
२०२३–२४ : ६०९ कोटी प्रवासी
२०२४–२५ : ६५१ कोटी प्रवासी

कोरोनानंतर नियमित रेल्वे सेवा सुरू झाल्याने प्रवासी संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.

या योजनेबाबत माहिती देताना उपमुख्य व्यवस्थापक व जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी सांगितले की,
“रेलवन ॲपद्वारे अनारक्षित तिकीट बुक करताना प्रवाशांनी डिजिटल पेमेंटचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी ही सवलत सुरू करण्यात आली आहे. यामुळे तिकीट बुकिंग अधिक सोपे, जलद आणि सुलभ होईल.”

पुण्यातील नियमित प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. एका प्रवाशाने सांगितले, “अनारक्षित प्रवासासाठी ॲपमुळे तिकीट खिडकीवरील रांगा टाळता येतात. आता अतिरिक्त सवलत मिळणार असल्याने डिजिटल तिकीट अधिक फायदेशीर ठरेल.”
दुसऱ्या प्रवाशाने म्हटले, “दैनंदिन प्रवासात छोटीसुद्धा बचत महत्त्वाची असते. शिवाय गर्दीच्या वेळी रांगेत उभे राहावे लागत नाही, हा मोठा फायदा आहे.”

भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासी वाहतुकीत अनारक्षित व सामान्य डब्यांचा मोठा वाटा असून, विशेषतः अल्प पल्ल्याच्या व उपनगरीय प्रवासात त्यांचे महत्त्व अधिक आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ॲप-आधारित तिकीट बुकिंगकडे प्रवाशांचा कल सातत्याने वाढत आहे, आणि नव्या सवलतीमुळे हा कल आणखी बळकट होण्याची शक्यता आहे.