पुणे, २१ जून २०२५: “या सरकारने दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही. कर्जमाफी बाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल,” असा स्पष्ट विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. पुण्यात जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजित ‘वारकरी भक्तियोग २०२५’ या कार्यक्रमात ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीबाबत राज्यात विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली आहे. निवडणुकीपूर्वी सरकारने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत, अद्याप कर्जमाफी न झाल्याची टीका करण्यात येत आहे. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “कर्जमाफीसाठी काही विशिष्ट नियम व प्रक्रिया असते. मी यावर आधीही सविस्तर सांगितले आहे. सरकार कोणतेही आश्वासन मोडणार नाही. उचित वेळी योग्य निर्णय घेतला जाईल.”
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांसोबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मोठ्या संख्येने वारकरी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. “योग ही केवळ व्यायाम पद्धत नसून, ती आपल्या प्राचीन जीवनशैलीचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आज संपूर्ण जग योग दिन साजरा करत आहे. पुण्यात ७०० महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी योग सत्र पार पडणे हे अत्यंत गौरवाचे आहे,” असे फडणवीस म्हणाले.
या कार्यक्रमात जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी ‘भक्तियोग’ हा विशेष कार्यक्रम देखील घेण्यात आला.
दरम्यान, आळंदी देवस्थानाकडून काल झालेल्या गैरप्रकारांबाबत विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले, “वारी ही आनंददायी परंपरा आहे. काही वाद निर्माण झाले असले तरी अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी संबंधितांशी चर्चा केली जाईल. यामध्ये नेमणूक सरकार करत नाही.”
तसेच आळंदीत सुरू असलेल्या कत्तलखाना प्रकरणावर भाष्य करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “विकास आराखड्यात कत्तलखान्यासाठी आरक्षण दाखवण्यात आले होते. मात्र कुठल्याही परिस्थितीत आळंदीमध्ये कत्तलखाना सुरू होणार नाही. संबंधित आरक्षण वगळण्याचे आदेश मी स्वतः दिले आहेत.”
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी