January 16, 2026

आंबेगाव तालुक्यातील पसारवाडी (माळीण) येथे दरड कोसळली; जीवितहानी टळली, पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू

पुणे, २३ जून २०२५ – आंबेगाव तालुक्यातील पसारवाडी (माळीण) येथे आज पहाटे साडेपाचच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

या घटनेबाबतचा सविस्तर अहवाल प्रांताधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव दत्तात्रय टिळेकर यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन प्रभागास सादर केला आहे.

तहसीलदार, आंबेगाव यांच्या अहवालानुसार, पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या रस्त्याच्या पश्चिम भागाला जमिनीत भेगा पडून जमिनीचा भाग कोसळला. परिणामी, सदर रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला आहे. उत्तर बाजूस असलेल्या तीन घरांमध्ये राहणाऱ्या चार नागरिकांना सुरक्षितरित्या स्थलांतरित करण्यात आले असून, त्यांच्यासाठी स्थानिक समाजमंदिरात निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कुटुंबांना तीन महिन्यांचे आगाऊ अन्नधान्य देखील देण्यात आले आहे.

सुधारणेसाठी गॅबियन संरचना प्रस्तावित
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करताना सांगितले की, दरड स्थिर करण्यासाठी गॅबियन संरचना आवश्यक असून, पावसाचा जोर ओसरल्यानंतर बांधकाम हाती घेतले जाणार आहे. दरम्यान, दरडग्रस्त भागातील माती व डबर हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

पुनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात
दरडप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या माळीण-पसारवाडी गावातील ३४ कुटुंबांसाठी सुरक्षित पुनर्वसनस्थळी जागा निश्चित करण्यात आली आहे. गट क्र. ३४० ते ३४६ या सात सर्वे क्रमांकांमध्ये ०.८० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण झाले असून, पुनर्वसनासाठी भूखंडांचे वाटप २६ जून २०२५ रोजी करण्यात येणार आहे. या कुटुंबांसाठी पंचायत समिती, आंबेगाव यांच्याकडून घरकुल योजनांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.