January 16, 2026

भाजप पदाधिकाऱ्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा गुन्हा; पक्षातून तात्काळ राजीनामा

पुणे, २५ जून २०२५ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे दौर्‍यादरम्यान, भाजप पुणे शहराचे सरचिटणीस प्रमोद कोंढरे यांनी एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजपने तात्काळ कारवाई करत संबंधित पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेतला आहे.

२३ जून रोजी नितीन गडकरी पुण्यातील शिवाजी रस्ता ते बाजीराव रस्ता दरम्यान प्रस्तावित भुयारी चौपदरी मार्गाच्या पाहणीसाठी आले होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाहणीस उशीर झाल्यामुळे काही पोलीस अधिकारी व कर्मचारी विश्रांतीसाठी गेले होते. त्याचवेळी कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्यासोबत असलेले प्रमोद कोंढरे यांनी एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले की, “माझ्या निदर्शनास ही माहिती काल रात्री आली. मी प्रमोद कोंढरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षपदाचा राजीनामा दिला असून तो आम्ही स्वीकारला आहे. तपास पूर्ण होईपर्यंत त्यांच्यावरील कारवाई स्थगित ठेवण्यात आली आहे.”
“घटनेच्या वेळी मी त्या कार्यक्रमात उपस्थित नव्हतो. गर्दी होती, त्यामुळे नेमकी परिस्थिती काय होती, हे तपासातच स्पष्ट होईल.” असे देखील घाटे यांनी स्पष्ट केले.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देत ट्विट केले की, “ही अत्यंत दुर्दैवी व संतापजनक घटना आहे. प्रमोद कोंढरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आम्ही इतक्यावरच थांबणार नाही. त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.”

त्यांनी पुढे म्हटले, “भारतीय जनता पक्ष हा संविधान, कायदा आणि महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. महिला सशक्ततेच्या विरोधात वागणाऱ्याला कोणतीही गय दिली जाणार नाही, मग तो आमच्या पक्षातील असो वा अन्य कुणी.”