पुणे, ३० जून २०२५ : पुण्याच्या ऐतिहासिक वारशातील अमूल्य ठेवा विश्रामबागवाड्याचा दर्शनी भाग येत्या जुलै अखेर नागरिक आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी दिली आहे.
विश्रामबागवाड्याच्या संवर्धन व दुरुस्तीच्या कामात होणाऱ्या विलंबाविरोधात क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या हस्तक्षेपानंतर हेरिटेज सेलचे उप अभियंता सुनील मोहिते यांनी जागेची पाहणी केली आणि उरलेली कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
मुख्य दर्शनी भागाचे सुशोभिकरण आणि लाकडी महिरप, सज्जा यांचे जतन हे अत्यंत नाजूक काम असल्याने त्याला वेळ लागल्याचे मोहिते यांनी स्पष्ट केले. मात्र आता काम अंतिम टप्प्यात असून, जुलै अखेर पर्यटकांना हा भाग पाहता येईल, असे त्यांनी सांगितले.
विश्रामबागवाड्याचे संवर्धनाचे काम गेली दोन वर्षे पुणे मनपा प्रकल्प विभागातील हेरिटेज सेलद्वारे सुरू आहे. या ऐतिहासिक वास्तूचा इतिहास १७५० मध्ये बाजीराव पेशवे (दुसरे) यांनी घेतलेल्या खरेदीपासून १८१० मध्ये उभारलेल्या वाड्यापर्यंतचा आहे. पुढे १८२० मध्ये येथे वेदशाळा, १८८० मध्ये आगीमुळे नुकसान, तर १९३० ते १९६० दरम्यान पुणे महापालिकेच्या कार्यालयासाठी वापर अशा अनेक ऐतिहासिक घडामोडी या वाड्याच्या आठवणींमध्ये नोंदल्या गेल्या आहेत.
सध्या वाड्यात एक पोस्ट ऑफिस आणि पीएमपीएमएलचे पास केंद्र कार्यरत आहे. दालन क्रमांक १ व २ चे काम यापूर्वीच पूर्ण होऊन पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.
“महापालिका प्रशासनाने आपला शब्द पाळून जुलै अखेर हा ऐतिहासिक ठेवा नागरिकांसाठी खुला करावा,” असा विश्वास संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला. तसेच या वाड्याचे व्यवस्थापन महापालिकेनेच करावे किंवा सक्षम संस्थेकडे सोपवावे, असा प्रस्तावही त्यांनी मांडला.
विश्रामबागवाड्याच्या जतन व संवर्धनातून पुण्याचा ऐतिहासिक वारसा पुन्हा उजळणार, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी