October 14, 2025

एसटीपेक्षा दीडपटच भाडेवाढ परवानगी; खाजगी ट्रॅव्हल्सवर कडक कारवाईची चेतावणी

पुणे, १० आॅक्टोबर २०२५ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) तिकिट दरापेक्षा दीडपटीपर्यंतच भाडेवाढ खाजगी बसचालकांना करता येणार आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास संबंधित बस मालक व चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आला आहे.

प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारले जात असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी बस ओनर असोसिएशनच्या प्रतिनिधींसह बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रवाशांच्या तक्रारी, रस्ता सुरक्षा आणि एसटी दरांच्या तुलनेत वाढीचे प्रमाण या मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली.

बैठकीनंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सांगितले की, “राज्य शासनाच्या २७ सप्टेंबर २०१८ च्या निर्णयानुसार, महामंडळाच्या तिकिट दरापेक्षा दीडपटच दर आकारण्याची मर्यादा ठरविण्यात आली आहे. काही प्रवासी बस मालक व चालक या नियमाकडे दुर्लक्ष करून मनमानी भाडे आकारत असल्याचे आढळल्यास, त्यांच्या विरोधात तातडीने कारवाई केली जाईल.”

बैठकीत मद्यप्राशन करून वाहन चालवणे, भ्रमणध्वनीचा वापर, धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे अशा नियमभंग करणाऱ्या चालकांवर देखील कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच बसमधील प्रवाशांचे आरक्षण व बस प्रवासातील सुरक्षिततेसंबंधी सूचना देण्यात आल्या.

या बैठकीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल पोसेले, सहायक प्रादेशिक अधिकारी तुषार आबळ (पिंपरी-चिंचवड) व युवराज पाटील (पुणे) तसेच विविध बस ओनर असोसिएशनचे २८ प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रवाशांना देखील आवाहन करण्यात आले आहे की, ज्या प्रवासात मनमानी भाडे आकारले जात आहे किंवा प्रवासादरम्यान अडचणी निर्माण झाल्या आहेत, अशा तक्रारी 7075320109 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर किंवा rto.12-mh@gov.in या ई-मेलवर आपल्या नाव, तिकीटाचे छायाचित्र आणि मोबाईल क्रमांकासह नोंदवाव्यात.