पुणे, १४ आॅक्टोबर २०२५ ः पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम आज (ता. १४) जाहीर केला आहे. ६ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असून, त्यावरील हरकती सूचनांवर विचार करून १० डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीवर काम सुरु करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठी ४ सदस्यांचे ४० प्रभाग आणि ५ सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंत जी मतदार नोंदणी केली होती, ती यादी महापालिका निवडणुकीसाठी वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जुलैनंतर ज्या मतदारांनी नोंदणी केली आहे, त्यांना पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ पर्यंतची यादी महापालिका प्रशासनाकडे पाठवली आहे. आता कसबा पेठ, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, कोथरूड, वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला, शिवाजीनगर यासह शिरूर आणि पुरंदर विधानसभा या मतदारसंघातील महापालिकेच्या हद्दीतील भागातील सुमारे ३५ लाख मतदारांचा यात समावेश आहे. या मतदार याद्यांचे प्रभाग निहाय विभाजन करण्यात यावे. त्यानंतर प्रभाग निहाय मतदार यादी जाहीर करून नागरिकांच्या हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत. आलेल्या हरकतींचा विचार करून योग्य ठिकाणी बदल करून अंतिम मतदार यादी मतदान केंद्र निहाय जाहीर केली जाईल.
असा आहे मतदार यादीचा कार्यक्रम
मतदार यादी ग्राह्य धरणाची तारीख – १ जुलै २०२५
महापालिकेला दिलेल्या युजर आयडीचा वापर करून मतदार यादी डाऊनलोड करणे – १४ ऑक्टोबर २०२५
तयार केलेली प्रारूप मतदार यादीवर हरकती सूचना मागविण्यासाठी यादी प्रसिद्ध करणे – ६ नोव्हेंबर २०२५
प्रारूप मतदार यादीवर हरकती सूचना दाखल करण्यासाठी अंतिम तारीख – १४ नोव्हेंबर २०२५
हरकतींचा विचार करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे – २८ नोव्हेंबर २०२५
मतदान केंद्रांची यादी जाहीर करणे – ४ डिसेंबर २०२५
मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे – १० डिसेंबर २०२५
काही महत्त्वाच्या बाबी
– हद्दीतील एकूण मतदार आणि प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील मतदारांची एकूण संख्या सारखी असावी.
– प्रारूप मतदार यादीत सर्व भाग, मतदार समाविष्ट व्हावेत, शहराच्या हद्दी बाहेरील नावे समाविष्ट होऊ नये.
– दुबार नावांसमोर विधानसभा निवडणुकीप्रमाणे विशिष्ट चिन्हे करून मतदारांची ओळख काटेकोरपणे करावी.
– विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करणे, नाव वगळणे, नावातील व पत्त्यातील दुरुस्ती आयोगाकडून केली जात नाही.
– प्रारूप मतदार यादीवरील हरकतींमध्ये लेखनिकांच्या काही चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अन्य ठिकाणी समाविष्ट होणे, विधानसभेला नाव असूनही महापालिकेला नाव वगळणे, मृत व्यक्तीचे नाव आढळल्यास किंवा त्यावर हरकत आल्यास त्याची नोंद करून घेणे.
– मतदार यादीचा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर न्यायालयाकडून निवडणुकीवर स्थगिती आल्यास त्याचा अहवाल महापालिका आयुक्तांनी तत्काळ सादर करावा.
More Stories
Pune: बालभारती ते पौड फाटा रस्त्याचा मार्ग झाला मोकळा
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा