January 10, 2026

भाजपचा प्रवेशसत्राचा धडाका; बराटे–शिवरकरांनी फडकावला कमळाचा झेंडा

पुणे, २७ डिसेंबर २०२५: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तिसऱ्या टप्प्यातही विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर दिलीप बराटे आणि काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र, माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी आमदार सुनील कांबळे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, शहराध्यक्ष धीरज घाटे, राज्यमंत्री दिलीप कांबळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने अन्य पक्षांतील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे प्रवेश घ्यायला अक्षरशः वेग आणला असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापूर्वी दोन टप्प्यांत सात माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आज आणखी दोन माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्याने विरोधी पक्षांची चिंता वाढली आहे.

वारजे भागातून माजी नगरसेवक असलेले दिलीप बराटे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडताना, “मी स्वतः निवडणूक लढवणार नाही. माझा पुतण्या भारतभूषण बराटे यांच्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे,” असे जाहीर केले. विशेष म्हणजे या प्रभागातून यापूर्वीच सचिन दोडके आणि सायली वांजळे हे दोन माजी नगरसेवक भाजपमध्ये आले असून, वारजेमध्ये भाजपची पकड अधिक घट्ट झाली आहे.

अभिजित शिवरकर हे २००७ ते २०१२ या कालावधीत नगरसेवक होते. प्रवेशानंतर त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका करत, “माझा १४ वर्षांचा राजकीय वनवास संपला आहे. आता वानवडीच्या सर्वांगीण विकासासाठी मी भाजपमध्ये आलो आहे. माझे वडील आजही काँग्रेसमध्ये आहेत,” असे स्पष्ट केले.

कोट :
“बराटे आणि शिवरकर यांच्या प्रवेशामुळे पुण्यात भाजपची ताकद आणखी वाढली आहे. पक्षात आल्यानंतर त्यांचा पूर्ण सन्मान राखला जाईल. भाजपची मतदार यादी उद्याच जाहीर होईल.”
— मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री