January 7, 2026

Pune: महात्मा फुले मंडईतून रणशिंग; प्रभाग २५ मधून कुणाल टिळक मैदानात

पुणे, ३० डिसेंबर २०२५ : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २५ महात्मा फुले मंडई, शनिवार पेठ येथून भारतीय जनता पक्षाकडून कुणाल शैलेश टिळक यांनी आज दमदार शक्तिप्रदर्शनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सहकारी उमेदवार, पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांची लक्षणीय उपस्थिती होती.

अर्ज दाखल केल्यानंतर कुणाल टिळक यांनी प्रभागातील नागरिकांनी आजवर दिलेला विश्वास व पाठिंबा हीच आपली खरी ताकद असल्याचे सांगितले. “पुणेकरांच्या सेवेसाठी काम करण्याची संधी मिळेल, असा मला पूर्ण विश्वास आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

प्रभागातील मूलभूत नागरी प्रश्नांची प्रभावी सोडवणूक, विकासकामांना गती, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन हे आपल्या कार्यपद्धतीचे केंद्रबिंदू असतील, असे टिळक यांनी स्पष्ट केले. नागरिकांशी थेट संवाद साधत विश्वासाचे नाते अधिक मजबूत करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

“विकास, विश्वास आणि सेवा” या त्रिसूत्रीवर प्रभाग क्रमांक २५ च्या सर्वांगीण विकासासाठी आपण सज्ज आहोत, असे सांगत आगामी निवडणुकीत मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळेल, असा आत्मविश्वास कुणाल शैलेश टिळक यांनी यावेळी व्यक्त केला.