पुणे, २५ जुलै २०२६: गिरिप्रेमीच्या नुकत्याच यशस्वीरीत्या पार पडलेल्या सर्व महिला माऊंट मेंटॉक कांग्री-II (६,२१० मी.) मोहीम २०२६ मधील सदस्यांचा सत्कार व अनुभव कथन कार्यक्रम बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी पुण्यातील आपटे सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमास जीजी इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सौ. भारती भगवानी तसेच प्राचार्या सौ. ध्रुवी भाटिया प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते मोहिमेतील सदस्य आणि मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात गिरिप्रेमीच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. उषःप्रभा पागे यांनी मोहिमेची पार्श्वभूमी मांडत महिला गिर्यारोहण, साहस शिक्षण आणि नेतृत्व विकासासाठी गिरिप्रेमी करत असलेल्या कार्याचा आढावा घेतला एव्हरेस्टवीर व श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त गिर्यारोहक श्री. आशिष माने यांनी मोहिमेचे नियोजन, अनुकूलन (Acclimatization), प्रशिक्षण आणि मोहिमेदरम्यान आलेल्या विविध आव्हानांची माहिती दिली. त्यानंतर मोहिमेतील सदस्यांनी हिमालयातील अनुभव, प्रतिकूल परिस्थिती, संघभावना, चिकाटी, आत्मविश्वास आणि मानसिक ताकदीबाबत उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मोहिमेवरील लघु प्रचार चित्रफित (Promo Film) प्रदर्शित करण्यात आली. मोहिमेवरील सविस्तर माहितीपट (Documentary) लवकरच प्रदर्शित होणार असल्याची माहितीही देण्यात आली.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देताना ज्येष्ठ गिर्यारोहक व एव्हरेस्टवीर श्री. भूषण हर्षे यांनी मोहिमेचे अभिनंदन करताना सांगितले की, “गिर्यारोहणात अपयश नसते; एकतर शिखर सर करता किंवा काहीतरी शिकता. सुरक्षिततेसाठी योग्य वेळी परतण्याचा निर्णय घेणेही तितकेच महत्त्वाचे असते.” त्यांनी मोहिमेतील सदस्यांच्या धैर्य, शिस्त आणि संघभावनेचे विशेष कौतुक केले.
तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार विजेते व गिरिप्रेमीचे अध्यक्ष श्री. उमेश झिरपे यांनी अमेरिकेतून पाठविलेल्या विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे मोहिमेतील सदस्य व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. या सर्व महिला पथकाने गिरिप्रेमीच्या हिमालयीन परंपरेला पुढे नेत महिला नेतृत्वाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असून यामुळे अधिकाधिक युवती साहसी क्षेत्राकडे आकर्षित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिमेतील सदस्य अनुष्का देव यांनी केले, तर गिरिप्रेमीचे सचिव श्री. मनोज कुलकर्णी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास गिरिप्रेमीचे संस्थापक सदस्य श्री. आनंद पलांडे, ज्येष्ठ गिर्यारोहक श्री. चंदन चव्हाण, श्री. श्रीपाद गोखले, श्री. अविनाश कांदेकर, श्री. संजय डोईफोडे तसेच एव्हरेस्टवीर श्री. गणेश मोरे, श्री. भूषण हर्षे, श्री. कृष्णा ढोकले, श्री. विवेक शिवदे आणि श्री. अखिल काटकर यांच्यासह अनेक गिरिप्रेमी सदस्य, साहसप्रेमी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी महिलांनी साहसी क्षेत्रात दाखविलेल्या धैर्य, जिद्द आणि नेतृत्वगुणांचे कौतुक करत अधिकाधिक महिलांनी साहसी उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
हा कार्यक्रम केवळ यशस्वी हिमालयीन मोहिमेचा गौरव नसून संघभावना, जिद्द, नेतृत्व आणि महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी उत्सव ठरला. माऊंट मेंटॉक कांग्री-II मोहिमेचे हे यश गिरिप्रेमीच्या समृद्ध हिमालयीन परंपरेत आणखी एक मानाचा तुरा ठरले असून साहस शिक्षण आणि महिला गिर्यारोहणाला प्रोत्साहन देण्याच्या संस्थेच्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली.

More Stories
विनायकी क्रीडा महोत्सवानिमित्त खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत 250खेळाडू सहभागी
पाचव्या पीवायसी कॅरम लीग स्पर्धेत 74 खेळाडू सहभागी
२०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या महिला हॉकी संघात महाराष्ट्राच्या ऋतुजा पिसाळची निवड