September 20, 2026

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे मोफत आरोग्य शिबिर; ११ हजार चष्म्यांचे वाटप

पुणे, १७ सप्टेंबर २०२६ : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवानिमित्त नागरिकांसाठी विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नेत्र तपासणी, फिजिओथेरपी आणि दंत तपासणीसह विविध आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, गरजू नागरिकांना तब्बल ११ हजार चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

या आरोग्य उपक्रमात विविध नामांकित रुग्णालये आणि संस्थांचा सहभाग आहे. अपोलो हॉस्पिटलच्या वतीने १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. अग्रवाल आय हॉस्पिटलतर्फे १७ ते २० सप्टेंबरदरम्यान नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

तसेच संचेती हॉस्पिटलच्या सहकार्याने २१ सप्टेंबर रोजी फिजिओथेरपी तपासणी केली जाणार आहे. त्याच दिवशी आणि २२ सप्टेंबर रोजी इंडियन प्रोस्थोडॉन्टिक सोसायटी व डॉ. विजय माब्रुकर यांच्या सहकार्याने दंत तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

याशिवाय मॉडर्न कॉलेजच्या वतीने २२ सप्टेंबर रोजी, तर ढोले पाटील यांच्या सहकार्याने २३ सप्टेंबर रोजी फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ही सर्व आरोग्य शिबिरे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या मंडपात आयोजित करण्यात आली आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात धार्मिक उपक्रमांसोबत सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आरोग्य तपासणीदरम्यान नागरिकांना त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांची माहिती मिळणार असून, आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही केले जाणार आहे.

याबाबत बोलताना ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन म्हणाले, “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजोपयोगी उपक्रमांचा उत्सव व्हावा, हा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. याच उद्देशाने यंदा विविध नामांकित रुग्णालये व संस्थांच्या सहकार्याने आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आवश्यक उपचारांबाबत सल्ला मिळणार आहे. विशेषतः गरजू नागरिकांना ११ हजार चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने हा आरोग्योत्सव होत असून ट्रस्टचे हे सेवाकार्य यापुढेही असेच सुरू राहील.”

ट्रस्टने अधिकाधिक नागरिकांनी, विशेषतः गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.