October 13, 2026

पाणी कपातीमुळे २.३० टीएमसी पाण्याची बचत, दुष्काळात ३७ दिवसाचा पाणीसाठा उपयोगी

पुणे, १३ आॅक्टोबर २०२६ : एल निनो आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ३१ जुलै २०२७ पर्यंत सुमारे २.३० टीएमसी पाण्याची बचत होण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, पुणे शहराला दररोज लागणाऱ्या १,७५० दशलक्ष लिटर पाण्याचा विचार करता, ही बचत शहराला तब्बल ३७ दिवस पुरू शकते. म्हणजेच, महिन्यापेक्षा सात दिवस अधिक काळ पुरेल इतके पाणी वाचण्याची शक्यता आहे.

पुणे शहराला दररोज सुमारे १,७५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी लागते. या प्रमाणानुसार ३० दिवसांसाठी ५२ हजार ५०० दशलक्ष लिटर, म्हणजेच सुमारे १.८५ टीएमसी पाण्याची गरज भासते. त्यामुळे शहराचा एका महिन्याचा पाणीवापर जवळपास १.८५ टीएमसी आहे.

दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवल्याने त्या दिवशी सुमारे १,७५० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होऊ शकते. मात्र, गुरुवारच्या पाणीबंदीनंतर शुक्रवारी पाणीपुरवठा सुरळीत करताना नेहमीपेक्षा २०० ते ३०० दशलक्ष लिटर अधिक पाणी लागण्याचा अंदाज गृहीत धरला आहे. त्यामुळे प्रत्येक आठवड्याची निव्वळ बचत १,४५० ते १,५५० दशलक्ष लिटर राहील. ३१ जुलै २०२७ पर्यंतच्या ४२ गुरुवारांचा विचार करता, ही बचत २.१५ ते २.३० टीएमसीपर्यंत पोहोचू शकते.

३७ दिवसांचा पाणीसाठा वाचणार

२.३० टीएमसी पाण्याचे रूपांतर दशलक्ष लिटरमध्ये केल्यास ते सुमारे ६५ हजार १५२ दशलक्ष लिटर होते. शहराच्या दररोजच्या १,७५० दशलक्ष लिटर पाणीवापरानुसार हा साठा सुमारे ३७.२ दिवस पुरेल. म्हणजेच, दर गुरुवारच्या पाणीबंदीतून होणारी संभाव्य बचत पुणे शहराच्या एका महिन्याच्या पाणीगरजेपेक्षा सुमारे २४ टक्के अधिक आहे.

मात्र, ही बचत प्रत्यक्षात किती होणार, हे गुरुवारी पाणीपुरवठा बंद केल्यानंतर धरणातून प्रत्यक्षात किती पाणी उचलले जाते आणि शुक्रवारी वाढीव वापर किती होतो, यावर अवलंबून असेल. त्यामुळे २.३० टीएमसी ही कमाल अंदाजित बचत असून, प्रत्यक्ष बचतीची आकडेवारी महापालिकेला नोंदवावी लागणार आहे.