November 16, 2026

थर्ड आय टी-20 खुल्या क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत नॉक ९९, वायएमसीए संघांची विजयी सलामी

पुणे, १६ नोव्हेंबर २०२६: थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपी यांच्या वतीने आयोजित थर्ड आय टी-20 खुल्या क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत नॉक ९९, वायएमसीए या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

कटारिया हायस्कुल येथील मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत जय पांडे(नाबाद ८९) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर नॉक ९९ संघाने ग्लोरी स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचा ८ गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली.

दुसऱ्या लढतीत मयंक कश्यप (५३धावा व ३-३५) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर वायएमसीए संघाने स्केल अप क्रिकेट अकादमी संघाचा ४१ धावांनी पराभव करत विजयी सुरुवात केली. याआधी स्पर्धेचे उदघाटन मोंटानाचे मालक प्रथम अगरवाल व निशांत श्रीवास्तव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक व थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपीचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: साखळी फेरी:
ग्लोरी स्पोर्ट्स फाउंडेशन: १९.४षटकात सर्वबाद १५७धावा(पियुश सोहनी ५३(३७,५x६), जॉन साने ३३, ऋषी उगळे २१, यश भंडारी ३-२२, रितेश तिडके ३-३७) पराभूत वि. नॉक ९९: १३.५ षटकात २बाद १५८धावा(जय पांडे नाबाद ८९(४४,१२x४,४x६), अभिषेक ताटे नाबाद ३१, ऋषी नाळे ३०, अक्षय पंचारिया १-२९);सामनावीर – जय पांडे;

वायएमसीए: २०षटकात ६बाद २१२धावा(अभिमन्यू सिंग ५९(३०,८x४,३x६), मयंक कश्यप ५३(२७,३x४,६x६), प्रशम गांधी २६, नित्यय लुंकड नाबाद २४, स्वप्नील लडकत ३-२६, प्रज्वल पांढरे २-४४)वि.वि. स्केल अप क्रिकेट अकादमी: २०षटकात ९बाद १७१धावा(अनुज जगदाळे ५२(३९,८x४), अभिनंदन पाटील नाबाद २३, कृष्णा बोरस्ते २१, प्रज्वल पांढरे १९, यश अन्नीराव १४, सोहेल शेख ४-१९, मयंक कश्यप ३-३५);सामनावीर – मयंक कश्यप.