October 20, 2025

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी आजच मतदान केंद्राची माहिती घ्या -डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. ११/०५/२०२४: जिल्ह्यातील मावळ, पुणे व शिरुर लोकसभा मतदार संघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार १३ मे रोजी मतदान होणार असून मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी धावपळ टाळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून आजच मतदान केंद्राची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदार संघात ७ लाख १४ हजार २७३ पुरुष तर ६ लाख ४७ हजार ३१ महिला मतदार असून एकूण १३ लाख ६१ हजार ३९२ मतदार आहेत. पुणे लोकसभा मतदार संघात १० लाख ५५ हजार ६२ पुरुष व १० लाख ३५५ स्त्री असे एकूण २० लाख ५५ हजार ७४१ मतदार आहेत तर शिरुर लोकसभा मतदार संघात १३ लाख ३३ हजार ८९० पुरुष व ११ लाख ९९ हजार ९९७ महिला असे एकूण २५ लाख ३४ हजार ८८ मतदार आहेत.

मतदारांना मतदार ओळख चिठ्ठीचे वाटप करण्यात येत आहे. मतदार चिठ्ठी मिळाली नसल्यास जवळच्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. जिल्हा निवडणूक प्रशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वॉर्डनिहाय तसेच विधानसभा मतदारसंघ स्तरावर मतदार सहाय्यता केंद्र स्थापन केले आहे. या केंद्राची मदत घेवून मतदान केंद्राची माहिती घेता येईल.

मतदारांच्या सोयीसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला असून यावरुन मतदार यादीतील नावाची माहिती घेता येईल. https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावरदेखील मतदाराचा तपशील शोधता येणार आहे. वोटर हेल्पलाईन ॲपवरदेखील ही सुविधा आहे.

पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करुन लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.