October 24, 2025

१८ जिल्ह्यात जाणता राजा महानाट्याचे ५५ प्रयोग करणाऱ्या कलाकारांचा सन्मान

पुणे, दि. २१ मे, २०२४ : जानेवारी ते मार्च २०२४ दरम्यान तब्बल ७२ दिवस राज्यातील १८ जिल्ह्यात ‘जाणता राजा’ या महानाट्याचे ५५ प्रयोग केलेल्या सर्व कलाकारांचा सत्कार महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच करण्यात आला. पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने   न-हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’मध्ये सदर सन्मान सोहळा संपन्न झाला.

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे शिवसृष्टीचे विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर, सुनील मुतालिक, अमृत पुरंदरे, प्रतिष्ठानचे महासचिव व जाणता राजा महानाट्याचे समन्वयक डॉ अजित आपटे, शिवसृष्टीचे व्यवस्थापक अनिल पवार आदी यावेळी उपस्थित होते. जाणता राजा महानाट्यात काम केलेल्या १५० हून अधिक कलाकारांना यावेळी मानाचिन्ह देत गौरविण्यात आले.

कार्यक्रमावेळी बोलताना जगदीश कदम म्हणाले, “सदर वर्ष हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष असल्याने प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही अनेक महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले. राज्यभरात ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग करणे हा त्यातीलच एक मोठा भाग होता. यामध्ये ७२ दिवसांत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रामधील १८ जिल्ह्यांत आम्ही एकूण ५५ प्रयोग केले. यामध्ये किमान साडे चार लाख शिवप्रेमींपर्यंत हे महानाट्य पोहोचल्याचे समाधान आम्हाला आहे. महाराष्ट्र शासनाने यासाठी केलेल्या मदतीशिवाय हे शक्य नव्हते त्यामुळे आम्ही त्यांचे कायम आभारी आहोत.”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वे वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘जाणता राजा’ महानाट्याचे हे प्रयोग अविस्मरणीय होते, असे सांगत या महानाट्याचे समन्वय व यामध्ये अभिनय केलेले डॉ अजित आपटे म्हणाले, “सलग तीन दिवस एक प्रयोग आणि एका दिवसाच्या अंतराने पुढच्या प्रयोगाला सुरुवात असे आमचे वेळापत्रक लागलेले होते. महानाट्याचे हे प्रयोग होत असताना आमच्या १५० हून अधिक कलाकारांच्या गटाने ४ भव्य सेटस् वापरले. आम्ही हे सर्व प्रयोग पूर्ण केले ही बाब आम्हा प्रत्येकासाठी अभिमानास्पद बाब आहे.” महानाट्यातील एक प्रमुख कलाकार असलेल्या वैभव जोशी यांनी राज्यभर केलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमांच्या नियोजनाचे कौतुक करीत आयोजकांचे आभार मानले. अमृत पुरंदरे यांनी प्रयोगा दरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला.

डॉ अजित आपटे यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले.